बुलढाणा : (बाळू वानखेडे / अशोक इंगळे) बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत रविवारी (२३ ऑगस्ट) मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळाला. सहकार क्षेत्रातील या महत्त्वाच्या निवडणुकीत जिल्हाभरातून तब्बल ९४.३ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली. एकूण २१ पैकी १२ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) वगळता इतर सर्वपक्षीय नेत्यांच्या ‘सहकार पॅनल’विरुद्ध सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ यांच्यात थेट लढत झाली आहे. विविध मतदारसंघांमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत आपला हक्क बजावला. यामध्ये इतर सहकारी संस्था मतदारसंघात १०० टक्के, ग्रामसेवक सोसायटीत ९८.६ टक्के, कृषी उत्पन्न प्रक्रिया मतदारसंघात ९६ टक्के, तर नागरी पतसंस्था मतदारसंघात ९२.२ टक्के मतदान झाले.
मतदानादरम्यान विविध केंद्रांवर दिग्गज नेत्यांची सरबराई पाहायला मिळाली. सहकार पॅनलचे प्रमुख व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा पूजा गायकवाड, कुणाल गायकवाड, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले-पाटील, माजी आमदार राहुल बोंद्रे व वृषालीताई बोंद्रे, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व शर्वरीताई तुपकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेल्या अर्पिता विजयराज शिंदे यांनी अखेरच्या दिवशी माघार घेतली. दुसरीकडे, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत मतदानादरम्यान आमदार श्वेताताई महाले आणि राहुल बोंद्रे हे एकत्र दिसून आले. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत डॉ. राजेंद्र शिंगणे यांचीही उपस्थिती असल्याने राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा रंगली होती.
जालना आणि नांदेड जिल्ह्यांच्या धर्तीवर बुलढाण्यातही बँक निवडणूक सर्वसंमतीने बिनविरोध होईल, अशी शक्यता सुरुवातीला वर्तवली जात होती. यासाठी खामगाव येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकाही पार पडल्या. सुरुवातीला डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी झालेल्या अर्ज माघारीनंतर आणखी १० जागा बिनविरोध झाल्या. अविरोध निवडून आलेल्या प्रमुख संचालकांमध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर व आ. श्वेताताई महाले यांचे वडील अंकुशराव पाटील, आ. संजय गायकवाड (शिंदे गट), जालिंदर बुधवत (ठाकरे गट), प्रसेनजित पाटील (शरद पवार गट), पांडुरंग पाटील (शेगाव), राजेश देशमुख (नांदुरा), दिनेश काळणे (शेगाव), कावेरी सोनसळे (देऊळगाव राजा) आणि मयूर बाहेकर (बुलढाणा) यांचा समावेश आहे.
१२ जागा सर्वपक्षीय एकजुटीतून बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादीने (अजित पवार गट) वेगळी चूल मांडल्याने उर्वरित ९ जागांचा तिढा सुटला नाही आणि निवडणूक अटळ ठरली. आता २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, या निवडणुकीला सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांची किनार लाभली आहे.
■ आर्थिक गर्तेतून बँकेचे यशस्वी पुनरुज्जीवन!
गेल्या काही वर्षांत डबघाईला आलेल्या व नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्रशासक राजवटीत नवसंजीवनी मिळाली. तत्कालीन अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री स्अव. जितदादा पवार यांनी बँकेला मदतीचा मोठा हात दिला. शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बँकेला राज्य शासनाच्या हमीवर ३०० कोटी रुपयांचे सवलतीचे कर्ज मिळाले. शिवाय, राज्य-केंद्र सरकार आणि नाबार्डकडून सुमारे २०० कोटींचे पुनर्भांडवलीकरण कर्जही उपलब्ध झाले.
बँकेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्राधिकृत अधिकारी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मुख्य प्रशासक तथा कार्यकारी अधिकारी डॉ. अशोकराव खरात यांनी २०१६ पासून कठोर पावले उचलली. कडक आर्थिक शिस्त व नियोजनबद्ध कारभाराच्या बळावर बँक केवळ तोट्यातूनच बाहेर आली नाही, तर तिने तब्बल २३ कोटी ५५ लाखांचा नफा कमावला. आगामी कर्जमाफीमुळे बँकेचा ताळेबंद अधिक मजबूत होण्याची दाट शक्यता आहे. १२ जागा बिनविरोध जिंकून ‘सहकार पॅनल’ने बहुमत निश्चित केले असले तरी, उर्वरित ९ जागांवर कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.