-सेल्फ सर्व्हेनंतर वगळलेले तसेच सर्वेक्षणापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांची पुरवणी यादी ग्रामसभेत तयार करा; गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर यांचे आवाहन
सिंदखेड राजा (सुरेश हुसे) : सिंदखेड राजा : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत पुढील टप्प्यात घरकुल मंजुरीची प्रक्रिया सुरू झाली असून, या प्रक्रियेत कोणताही पात्र व गरजू लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ३० ऑगस्टपर्यंत होणाऱ्या ग्रामसभांमध्ये आवास प्लस सर्वेक्षणातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीची योग्य पद्धतीने छाननी करून ती अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामपंचायतींनी वस्तुनिष्ठ व पारदर्शक पद्धतीने याद्यांची छाननी करून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच स्थान द्यावे, असे आवाहन गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर यांनी केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत आवास प्लस सर्वेक्षणातून तयार झालेल्या लाभार्थ्यांच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीला अंतिम स्वरूप देण्यासाठी ग्रामसभांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ग्रामसभेमध्ये उपलब्ध याद्यांची तपासणी करताना संबंधित लाभार्थी शासनाच्या निकषांनुसार पात्र आहे किंवा नाही, याची योग्य पडताळणी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर आहे.
सिस्टीममधून वगळलेल्यांसाठी स्वतंत्र यादी
अनेक गरजू कुटुंबांनी सेल्फ सर्व्हे केलेला असतानाही काही तांत्रिक अथवा अन्य कारणांमुळे त्यांची नावे सिस्टीममधून वगळली गेली असण्याची शक्यता आहे. अशा गरजू व पात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी ग्रामसभेच्या ठरावाद्वारे तयार करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पात्र असूनही यादीत नाव नसलेल्या कुटुंबांना आपली बाब ग्रामसभेसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.
सेल्फ सर्व्हे न केलेल्यांनाही संधी
तसेच काही गरजू कुटुंबांना सेल्फ सर्व्हेची प्रक्रिया करता आलेली नसेल; मात्र त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती घरकुलासाठी पात्र असेल, तर अशा लाभार्थ्यांचीही पुरवणी यादी ग्रामसभेच्या ठरावाद्वारे तयार करण्यात यावी, असे बांगर यांनी स्पष्ट केले आहे. या याद्या तयार करताना केवळ प्रत्यक्ष गरजू आणि शासनाच्या निकषांनुसार पात्र असलेल्या लाभार्थ्यांचाच विचार करावा. कोणत्याही परिस्थितीत अपात्र व्यक्तींची निवड होणार नाही, याची ग्रामपंचायत प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
आर्थिक गैरव्यवहाराला थारा नको
घरकुलाच्या लाभार्थी याद्या अंतिम करताना कोणत्याही पदाधिकारी किंवा कर्मचाऱ्याने आर्थिक गैरव्यवहार करू नये, असा स्पष्ट संदेश गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर यांनी दिला आहे. घरकुल योजना ही गरजू कुटुंबांना हक्काचे निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असल्याने यामध्ये पारदर्शकता, निष्पक्षता आणि शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. लाभार्थी निवडीत कोणताही दबाव, पक्षपात किंवा आर्थिक व्यवहार होऊ नये. ग्रामसभेच्या माध्यमातून प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडून पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका ग्रामपंचायतींनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामसभेच्या निर्णयानंतर वरिष्ठ स्तरावर मंजुरी
ग्रामसभेत छाननी करून अंतिम करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित स्तरावरून प्राप्त झाल्यानंतर त्या वरिष्ठ स्तरावर मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. वरिष्ठ स्तरावरून याद्यांना मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील घरकुल मंजुरीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामसभेत घरकुलाच्या याद्यांची माहिती तपासावी. पात्र असूनही नाव यादीत नसल्यास किंवा सेल्फ सर्व्हे करूनही नाव सिस्टीममधून वगळले गेले असल्यास संबंधित ग्रामसभेत आपली बाब मांडावी. पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा आणि कोणताही गरजू लाभार्थी प्रक्रियेतून वंचित राहू नये, यासाठी ग्रामपंचायतींनी जबाबदारीने व पारदर्शकपणे काम करणे गरजेचे आहे.