-महागाईने त्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी माजी राज्यमंत्री सुबोध सावजींचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
बुलढाणा (सुरेश हुसे) : सणासुदीच्या काळात साखरेसह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य कुटुंबांच्या घरखर्चावर मोठा ताण येत असल्याचे सांगत माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार सुबोधभाऊ सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साखर, खाद्यतेल, कडधान्ये आणि अन्य घरगुती वस्तूंचे दर निम्म्यावर आणण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी कुटुंबांच्या आर्थिक व सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम करणाऱ्या दारूचे दर दहापट वाढवावेत, अशी आगळीवेगळी मागणीही त्यांनी केली आहे.
सावजी यांनी २२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून महागाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. गेल्या काही दिवसांत साखरेच्या दरात झालेली वाढ सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदू धर्मातील सण-उत्सवांमध्ये घरगुती गोड पदार्थ तयार करण्याची परंपरा असून, त्यासाठी साखर आवश्यक असते. त्यामुळे सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्याचा थेट फटका घरगुती बजेटला बसत असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली. मात्र, दुसरीकडे साखर, खाद्यतेल, कडधान्ये यांसारख्या जीवनावश्यक वस्तू महाग होत असतील, तर मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा मोठा भाग वाढलेल्या घरखर्चातच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना प्रत्यक्ष दिलासा द्यायचा असेल, तर जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणणे आवश्यक असल्याचे सावजी यांनी पत्रात म्हटले आहे.
दारूमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक आणि सामाजिक परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सावजी यांनी दारूचे दर दहापट वाढवण्याची मागणी केली आहे. दारू महाग केल्यामुळे तिच्या वापरावर काही प्रमाणात नियंत्रण येण्यास मदत होईल आणि शासनाच्या महसुलातही वाढ होऊ शकते, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. वाढीव महसुलाचा उपयोग जनतेला आवश्यक असलेल्या वस्तू स्वस्त करण्यासाठी करता येईल, असेही त्यांनी सुचवले आहे. विधानसभा आणि विधान परिषदेत सरकारकडे पुरेसे बहुमत असल्याने जनहिताचे निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देणारे ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी सावजी यांनी केली आहे. साखर, खाद्यतेल, कडधान्यांसह घरगुती वापराच्या वस्तू स्वस्त कराव्यात आणि दारूचे दर मोठ्या प्रमाणात वाढवावेत, या मागणीचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा सावजी यांनी व्यक्त केली आहे.