-अविवाहित राहून आयुष्यभर केले ज्ञानदानाचे पवित्र कार्य; साखरखेर्ड्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : संपूर्ण कुटुंबातील सदस्य उच्च शिक्षण घेऊन विविध उच्च पदांवर कार्यरत असतानाही आपल्या मायभूमीत राहून, अविवाहित जीवन जगत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे आणि सर्वांना मदतीचा हात देणारे आदर्श व्यक्तिमत्त्व रमनदादा मायी अनंतात विलीन झाले. त्यांच्या कार्याचा ठसा शेवटपर्यंत कायम राहिला. वृद्धापकाळाने २० ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांचे निधन झाले. आज सकाळी मोठ्या शोकाकुल वातावरणात भोगावती नदीजवळील हिंदू स्मशानभूमीत मंत्रोच्चारात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
साखरखेर्डा येथील मायी घराणे हे ऐतिहासिक परंपरा जोपासणारे आणि वेदशास्त्रसंपन्न घराणे म्हणून ओळखले जाते. या घराण्यातील अनेक सदस्यांनी उच्च शिक्षण घेऊन विविध उच्च पदांवर आपला ठसा उमटविला आहे. मराठवाड्यातील परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चारुदत्त मायी हे रमनदादा मायी यांचे बंधू आहेत. कुटुंबातील अनेक सदस्य पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई तसेच परदेशात स्थायिक झालेले आहेत. मात्र, रमन मायी यांनी आपल्या मायभूमीशी नाळ कायम जोडून ठेवत साखरखेर्डा येथील एस. ई. एस. हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावली आणि संस्थेच्या प्रगतीसाठी मोठा हातभार लावला. बी.एस्सी. गणिताचे शिक्षक असल्याने त्यांची शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षणाचा विषय होती. कोणताही विद्यार्थी शिकवणीसाठी त्यांच्याकडे आला तरी ते एक रुपयाही फी न घेता त्याला शिकवत असत. ज्ञानदान हेच आपले कर्तव्य मानून त्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वेळप्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना वही, पेन यांसारखे शैक्षणिक साहित्यही ते स्वतः खरेदी करून देत असत. शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, ही त्यांची ठाम धारणा होती. स्वतः अविवाहित राहून साधेपणाने जीवन जगताना त्यांनी अनेक गरजू व्यक्तींना मदतीचा हात दिला. त्यामुळे रमनदादा मायी हे केवळ शिक्षक नव्हते, तर अनेक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्त्व होते.
त्यांच्या निधनानंतर आज सकाळी भोगावती नदीजवळील हिंदू स्मशानभूमीत शास्त्री यांच्या मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे बंधू सुरेश आणि दीपक मायी यांनी मुखाग्नी दिला. यावेळी शिवसेना नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सरपंच रविंद्र पाटील, भाजपचे प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष दसरे, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक इंगळे, प्राचार्य विलास ठाकूर, माजी उपसरपंच दर्शन गवई, डॉ. सुनील देशपांडे, डॉ. किशोर देशमुख तसेच एस. ई. एस. हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. रमनदादा मायी यांच्या निधनाने साखरखेर्डा परिसराने एक आदर्श शिक्षक, समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आणि निरपेक्षपणे ज्ञानदान करणारा मार्गदर्शक गमावल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.