-‘श्रीं’ची पालखी सिंदखेडराजात दाखल; तालुका प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून भक्तिभावाने स्वागत
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने मंगळवारी (दि. ११) मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावच्या ‘श्रीं’च्या पालखीने पंढरपूरहून परतीच्या प्रवासात सिंदखेडराजात प्रवेश केला. माळ सावरगाव घाट येथील विदर्भ प्रवेशद्वारावर सुमारे ७०० वारकऱ्यांसह दाखल झालेल्या पालखीचे तालुका प्रशासनाच्या वतीने भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.
माळ सावरगाव घाटातील विदर्भ प्रवेशद्वारावर पालखी दाखल होताच उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे व गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर यांनी तालुका प्रशासनाच्या वतीने ‘श्रीं’च्या पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले. यावेळी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पालखीचे स्वागत करताना अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रवासाची माहिती जाणून घेतली. पालखीच्या आगमनावेळी विदर्भ प्रवेशद्वारावर भक्तांची मोठी गर्दी झाली होती. टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. प्रशासनाच्या वतीने पालखी मार्गावरील व्यवस्था, वाहतूक नियंत्रण तसेच वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे यांनी ‘श्रीं’च्या पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले. सिंदखेडराजाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनीही पालखीचे मनोभावे स्वागत करून श्रींचे दर्शन घेतले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून ‘श्रीं’च्या पालखीच्या स्वागतासाठी सर्वच स्तरांतील मान्यवर एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरील माळ सावरगाव घाटातील विदर्भ प्रवेशद्वारावर पालखी दाखल होताच भाविकांमध्ये उत्साह संचारला. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भक्तांच्या घोषणांनी परिसर भारावून गेला. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी नाव्हा ते सिंदखेडराजा मार्गावर ठिकठिकाणी चहा, पिण्याचे पाणी आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच विविध संस्थांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला.
महसूल प्रशासनाचे विशेष नियोजन
पालखी सोहळा सुरळीत पार पडावा, यासाठी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. नायब तहसीलदार संदीप बंगाळे, मंडळ अधिकारी टेकाळे, ग्राम महसूल अधिकारी राहुल देशमुख व जी. वाय. दराडे, वाहनचालक कैलास चव्हाण व राजू खरात, महसूल सहायक संजय सोनवणे, राजू जाधव, जनार्दन जोरे, मनोज सोळंके यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पालखी मार्गावरील वाहतूक, भाविकांना आवश्यक सुविधा आणि विविध विभागांमध्ये समन्वय राखण्यावर प्रशासनाने विशेष भर दिला.
माळ सावरगाव घाटात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून स्वागत
सिंदखेडराजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माळ सावरगाव घाट येथे जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ‘श्रीं’च्या पालखीचे स्वागत केले. यावेळी अपर जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, देऊळगाव राजा उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन ठोसरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत ठाकरे, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक काकविपुरे तसेच पालखी बंदोबस्ताचे प्रभारी पोलिस निरीक्षक गजानन कांबळे उपस्थित होते.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने विशेष बंदोबस्त तैनात केला होता. जिल्हा हद्दीपासून शेगावपर्यंत तीन पोलिस निरीक्षक, चार पोलिस उपनिरीक्षक, २२ पोलिस अंमलदार, दहा महिला पोलिस अंमलदार, नऊ वाहतूक अंमलदार आणि दोन वाहनांसह पोलिस पथके तैनात करण्यात आली होती. माळ सावरगाव घाट येथील विदर्भ प्रवेशद्वारावर स्वागत झाल्यानंतर पालखीने जालना-नाव्हा-सिंदखेडराजा मार्गाने शहरात प्रवेश केला. मोती तलावाजवळून जुन्या नागपूर डाक लाईन मार्गे जिजामाता नगर, रामेश्वर मंदिर, रंगमहाल, काळा कोट मार्गे पालखी तहसील कार्यालय परिसरातून जिजामाता शाळेत पोहोचली. जिजामाता शाळेत पालखीचा मुक्काम राहणार आहे. मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले, तर अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी चहा, पाणी आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली.
श्री गजानन महाराज दिंडीच्या या पालखी सोहळ्याचे यंदाचे ५७वे वर्ष आहे. शेगाव-पंढरपूर-शेगाव असा भक्तिमय प्रवास करणाऱ्या या दिंडीत सुमारे ७०० वारकरी सहभागी झाले आहेत. आषाढी वारीनंतर ‘श्रीं’च्या पालखीचे विदर्भात आगमन हा भाविकांसाठी श्रद्धा आणि आनंदाचा सोहळा ठरतो. तालुका प्रशासन, पोलिस यंत्रणा, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या समन्वयातून पालखी सोहळा सुरळीत पार पडला. भक्तीचा जयघोष, वारकऱ्यांची सेवा आणि प्रशासनाचा सक्रिय सहभाग यामुळे सिंदखेडराजातील हा पालखी सोहळा श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणारा ठरला.