-लाखो भाविकांच्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, सुरक्षा, आरोग्य, पार्किंग व दर्शन व्यवस्थेचे नियोजन
पुणे (अर्जुन मेदनकर) : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या नियंत्रणाखाली बैठक घेण्यात आली. यावेळी श्रावण महिन्यातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन विविध विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस आमदार बाबाजी काळे, आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, आंबेगाव-जुन्नर उपविभागीय अधिकारी अर्चना तांबे, देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, कार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दरवर्षी श्रावण महिन्यात देशभरातून लाखो भाविक श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येतात. यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा तसेच भाविकांच्या दर्शन व्यवस्थेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार बाबाजी काळे, खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी, जुन्नर-आंबेगावचे उपविभागीय अधिकारी, खेड व आंबेगावचे तहसीलदार, खेड व आंबेगावचे गटविकास अधिकारी, पोलिस अधिकारी, श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष व सदस्य तसेच संबंधित महसूल व ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच उपस्थित होते.
श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुलभ दर्शनाचा अनुभव मिळावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये, भाविकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी करण्यावर भर दिला. श्रीक्षेत्र भीमाशंकरची धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्या असलेली महत्त्वपूर्ण ओळख लक्षात घेता, भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी आवश्यक सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन सज्ज ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.