– रविकांत तुपकरांचा कडक इशारा : जळगाव जामोद तालुक्यातील १५ पूरग्रस्त गावांचा पाहणी दौरा; महसूल यंत्रणेला झापले!
जळगाव जामोद/बुलढाणा (बाळू वानखेडे) : ३१ जुलैच्या मध्यरात्री जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यावर कोसळलेल्या २५५ मिमी विक्राळ पावसाने संपूर्ण तालुक्याला अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकले आहे. शेकडो शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली असून हजारो एकरांवरील सुपीक माती खरडून गेली आहे. या भीषण परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’चे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुधवारी गावागावांत जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर धडक दिली. पंचनाम्यातील तफावत पाहून संतापलेल्या तुपकरांनी महसूल व कृषी यंत्रणेला कडक शब्दांत खडसावत, जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी तातडीने चर्चा केली. “आठवड्यात १०० टक्के मदत द्या, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू,” असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी भेंडवळ खुर्द, भेंडवळ बुद्रुक, चावरा, ईलोरा, मडाखेड खुर्द, पळसखेड, येनगाव, वडशिंगी, उटी खुर्द, उटी बुद्रुक, निंभोरा बुद्रुक, खेर्डा बुद्रुक, सातळी, जळगाव शहर व तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. अनेक ठिकाणी शेतजमीन तब्बल ४ ते ५ फूट खोलपर्यंत खरडून गेली आहे, तर काही ठिकाणी विहिरी वाहून गेल्या व खचल्या आहेत. शेतातील बांध फुटून शेती पूर्णपणे अस्तित्वहीन झाल्याचे भयावह चित्र पाहणीदरम्यान समोर आले. या पाहणी दौऱ्यात युवा नेते अक्षय पाटील, अनिलसिंह राजपूत, शिवदास खिरोडकार, भागवत वाघ, वैभव जाणे, अजय गिरी, आकाश आटोळे, असलम शेख, दीपक पाटील, दिलीप बोबळे, अझहर शेख, राजेंद्र राखोडे, त्रिलोकसिंह राजपूत, संतोष गणगे, कय्यूम खान, सदाशिव जाणे, तुकाराम पाटील, प्रमोद तिजारे, अनंता मारोडे, विष्णू कुकडे, राजू पाटील शित्रे, प्रणव देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक शेतकरी सहभागी झाले होते.
—
“जिथे १०० टक्के नुकसान झाले आहे, तिथे पंचनाम्यात ३० ते ४० टक्केच नुकसान का दाखवले जात आहे? तुम्हाला नुकसान कमी दाखवण्याचे आदेश कुणी दिले? शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासाठीच ही यंत्रणा काम करत आहे का? आकडेवारीचा खेळ बंद करा. आठवड्याच्या आत १०० टक्के भरपाई थेट खात्यात जमा करा, नाहीतर गाठ आमच्याशी आहे.”
— रविकांत तुपकर (संस्थापक अध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना)
—
८४ हजार हेक्टरहून अधिक पिके पाण्याखाली!
कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार ३० आणि ३१ जुलैच्या अतिवृष्टीत बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ८४ हजार ८७० हेक्टर वरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ४९५ गावे बाधित झाली असून १ लाख १३ हजार ४३९ शेतकऱ्यांना या आपत्तीचा फटका बसला आहे. हा केवळ प्राथमिक अंदाज असून प्रत्यक्ष नुकसान यापेक्षाही अधिक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. केवळ मदतीची मागणी न करता भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी तुपकरांनी महत्त्वाचा उपाय सुचवला. “ग्लोबल वॉर्मिंगमुळे अतिवृष्टीच्या घटना वाढणार आहेत. सातपुड्यातून वेगाने येणारे पाणी नद्या-ओढ्यांचे खोलीकरण नसल्याने थेट शेतीत घुसून जमीन खरडून नेते. त्यामुळे सरकारने या भागात वैज्ञानिक पद्धतीने नद्यांचे खोलीकरण करण्यासाठी तातडीने ‘पायलट प्रोजेक्ट’ सुरू करावा,” अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे केली.