शेवगावात २४ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : “लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर व्यापक दूरदृष्टी असलेले विकासपुरुष होते. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कृषी, शिक्षण, सहकार आणि धार्मिक क्षेत्रात उभारलेले कार्य आजही समाजाला दिशा देणारे आहे,” असे प्रतिपादन हभप ज्ञानेश्वर महाराज माऊली यांनी केले. लोकनेते मारुतराव घुले यांच्या २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी स्व. घुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आपल्या प्रवचनात ज्ञानेश्वर महाराज माऊली म्हणाले, “स्व. मारुतराव घुले यांनी ग्रामीण विकासाचा व्यापक विचार करून सहकार चळवळीला बळ दिले. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवले, तर शिक्षणाच्या प्रसारासाठी संस्थांची उभारणी करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दारे खुली केली. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी समाजात एकोपा, संस्कार आणि सेवाभाव वाढवण्याचे कार्य केले.”
या कार्यक्रमाला माजी आमदार नरेंद्र पाटील घुले, चंद्रशेखर घुले पाटील, क्षितिज घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, हभप उद्धव महाराज, स्वामी प्रकाशनंदजी महाराज, हभप राम महाराज झिंजुर्के, ज्ञानेश्वर संस्थान नेवासाचे अध्यक्ष देविदास मस्के महाराज उपस्थित होते. यासह नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.