-जमावबंदी आदेशाच्या पार्श्वभूमीवर १५० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहरम उत्सव शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले होते. तसेच पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भारत हा विविध धर्म आणि संस्कृतींनी नटलेला देश असून येथे सर्व धर्मांचे सण मोठ्या उत्साहात आणि सलोख्याने साजरे केले जातात. यावर्षी २३ जूनपासून मोहरम महिन्याला सुरुवात झाली. इस्लाम धर्मात मोहरम हा शोकाचा महिना मानला जातो. इस्लामी दिनदर्शिकेतील हा पहिला महिना असून, करबला येथे हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत हसन आणि हजरत हुसैन यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ मोहरम साजरा केला जातो. शनिवार, २७ जून रोजी सकाळी जाफराबाद मोहल्ला, गुजरी चौक, दगडी मस्जिद, बाजार गल्ली आणि बसस्थानक परिसरातून मोहरमची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी जाफराबाद मोहल्ला, गणपती चौक, होळकर नगर, रोहीलपुरा आणि माळीपुरा मार्गे मिरवणूक काढून भोगावती नदीवर ताजियांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि ठाणेदार गजानन करेवाड यांनी शांततेत उत्सव पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानले. “गावात सामाजिक सलोखा आणि शांतता टिकविणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. प्रत्येक समाजातील नागरिकांना परस्पर सहकार्याने दैनंदिन व्यवहार करावे लागतात. त्यामुळे सण-उत्सव साजरे करताना कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्वांनी सतर्क राहावे,” असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी चंद्रशेखर शुक्ल, अमित जाधव, दिलीप बेंडमाळी, संतोष मंडळकर, कमलाकर गवई, आदित्य तिवारी तसेच मोहरम उत्सव समितीचे शेख चाँद कुरेशी, अयुब कुरेशी, दाऊद कुरेशी, सय्यद रफीक, शेख शफी जमादार, शेख रफीक तांबोळी, शेख कयुम मेंबर, इब्राहिम शहा, युनूस नाईकवाडी, अन्सार कुरेशी, अशफाक शहा, सांडू ठेकेदार, शेख रशीद, इरफान सर आदी उपस्थित होते. मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे, पोलीस अधिकारी मैदने, मुन्ना राजपूत यांच्यासह पोलीस कर्मचारी, दंगानियंत्रण पथक आणि होमगार्ड अशा सुमारे १५० कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.