-‘शब्द पाळा… नाहीतर सरकारला झोप लागू देणार नाही!’; कर्जमुक्तीच्या लढ्याचा ‘प्लॅन बी’ तयार
बुलढाणा (सुरेश हुसे) : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीच्या लढ्याने आता निर्णायक टप्पा गाठला असून, सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. अन्नत्याग आंदोलनामुळे प्रकृती खालावल्याने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत असतानाही तुपकर यांनी राज्यभरातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ऑनलाइन बैठक घेऊन पुढील आंदोलनाची रणनीती निश्चित केली.
बैठकीत सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या पुढील आंदोलनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सरकारने कर्जमुक्ती आणि पीकविम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. आता त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर पुढील आंदोलन अधिक व्यापक आणि सरकारला हादरवून सोडणारे असेल, असा निर्धार तुपकर यांनी व्यक्त केला. पाच दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनामुळे तुपकर यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यानंतर त्यांना प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र रुग्णालयातील बेडवरूनही त्यांनी आंदोलनाची सूत्रे हातातून जाऊ दिली नाहीत. बुधवारी रात्री झालेल्या ऑनलाइन बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील परिस्थिती आणि संघटनात्मक तयारीची माहिती दिली. आगामी आंदोलनाची दिशा, स्वरूप आणि नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली.
सरकारने बैठकीसाठी काही दिवसांचा अवधी मागितला असून, आपणही आणखी चार-पाच दिवस संयम बाळगणार आहोत. मात्र त्यानंतरही ठोस निर्णय झाला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही तुपकर यांनी दिला. यावेळी बोलताना तुपकर म्हणाले, “आतापर्यंतचा लढा महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने झाला. मात्र सरकारने विश्वासघात केला, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे असेल. मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसेन. त्या आंदोलनामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल.” दरम्यान, या ऑनलाइन बैठकीनंतर राज्यभरातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र असून, सरकारच्या पुढील भूमिकेकडे आता राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सरकार दिलेला शब्द पाळते की संघर्षाची नवी ठिणगी पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.