-इंदिरानगर परिसरातून आरोपी ताब्यात; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
चिखली (सुरेश हुसे) : बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने चिखली शहरात १६ मे रोजी धडक कारवाई करत तब्बल ९ किलो २१५ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची अंदाजे किंमत ४ लाख ६० हजार ७५० रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार १६ मे २०२६ रोजी चिखली येथील इंदिरानगर परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी सय्यद समीर सय्यद सलीम हा आरोपी आपल्या घरात अवैधरित्या गांजा विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून ९ किलो २१५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायदा कलम ८ (c), २०(B)(ii)(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत एपीआय यशोदा कणसे, हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, अनुपकुमार मेहेर, विजय वारुळे, एनपीसी अरविंद बडगे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वनारे, मंगेश सनगाळे, सतीश नाटेकर, दीपक वायाळ, चालक हेड कॉन्स्टेबल समाधान टेकाळे, एनपीसी रवी भिसे तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.