टरबुजाला १० ते १५ रुपये किलोचा दर;शेतकरी सापडले आर्थिक अडचणीत; उत्पादन, वाहतूक खर्च पदरी पडत नसल्याची स्थिती!
चिखली (अंकुश पाटील) : सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या आशेने टरबुजाची लागवड केली. उत्पादनही दर्जेदार झाले, मात्र बाजारपेठेत एकाच वेळी आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या टरबुजाचे दर आता १० ते १५ रुपयांवर आले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक ठिकाणी टरबूज फेकून देण्याची वेळ आली असून, शेतकरी संकटात सापडला आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांत मिळालेल्या चांगल्या दरामुळे यंदा टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. सुरुवातीला दर टिकून होते, मात्र आवक वाढताच बाजार कोसळला. त्यातच अवकाळी पावसाचा फटका बसल्याने ग्राहकांची मागणी घटली आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवरही परिणाम झाला असून, स्थानिक बाजारपेठेत मालाचे ढीग साचले आहेत. किरकोळ बाजारातही टरबुजाचे दर कमालीचे खाली आले आहेत.
विमा नाही, अनुदानही नाही!
टरबुजासारख्या वेलवर्गीय पिकांना शासनाचे कोणतेही अनुदान मिळत नाही. तसेच, या पिकांचा पीक विम्यात समावेश नसल्याने नैसर्गिक संकट किंवा बाजार कोसळल्यास शेतकऱ्याला कोणताही आधार उरत नाही. मालाला उठाव नसल्याने उभ्या पिकात जनावरे सोडण्याची किंवा टरबूज फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. दर नसल्याने व्यापाऱ्यांनी माल उचलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हतबल झालेले शेतकरी स्वतः रस्त्यावर बसून टरबुजाची विक्री करत आहेत. शहरातील विविध भागांत ट्रॅक्टर भरून माल आणला जात असून, मिळेल त्या भावात तो विकावा लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
“उन्हाळ्यात कलिंगड आणि खरबूज विक्रीतून चार पैसे मिळतील अशी आशा होती. मात्र, अवाक जास्त आणि अवकाळी पावसामुळे मागणी घटली आहे. परिणामी, भाव कोसळल्याने मोठे नुकसान होत आहे.” — रमेश शिवरकर, शेतकरी
गेल्या काही वर्षांपासून आम्ही टरबूज पिक घेत आहोत. यंदा उत्पादन चांगले आले, पण निर्यात बंद झाल्याने आणि दर कोसळल्याने तयार माल शेतातच खराब होत असल्याची व्यथा एका शेतकर्याने व्यक्त केली. दुसर्या शेतकर्याने कमी दरात विक्री करण्यास तयार असूनही व्यापारी माल घ्यायला पुढे येत नाहीत. त्यामुळे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकर्यांना या कोंडीतून बाहेर काढावे अशी मागणी उत्पादकांकडून होत आहे.