-जिजामाता विद्यालयातील प्रकार; जखमी विद्यार्थ्यावर उपचार, तक्रार अद्याप नाही
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील जिजामाता विद्यालयात इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या जिंतूर तालुक्यातील एका विद्यार्थ्याला लघवीवरून परत येण्यास विलंब झाल्याने त्याचे डोके डेस्कवर आपटून जखमी केल्याची घटना दि. २१ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली.
येथील श्रीमज्जगदगुरु पलसिद्ध महास्वामी मठात शिवपाठ शिकण्यासाठी राज्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवपाठाबरोबर त्यांचे प्राथमिक शिक्षण साखरखेर्डा येथे व्हावे म्हणून बहुतांश विद्यार्थी जिजामाता विद्यालयात शिक्षण घेतात. या विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा चांगला असल्याने ते प्रसिद्ध आहे. अशा या विद्यालयात इयत्ता सातवीत शिकणारा अनिकेत सिद्धेश्वर स्वामी (रा. मानकेश्वर, ता. जिंतूर) हा विद्यार्थी एका शिक्षकाची परवानगी घेऊन लघवीला गेला होता. परत आल्यानंतर वर्ग शिक्षक राजेंद्र पडघान यांनी तो कुठे गेला होता, असे विचारत क्षणार्धात त्याचे डोके डेस्कवर आपटले. यात तो जखमी झाला व त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला.
वर्गातील स्वराज स्वामी व वेदांत भालेकर यांनी तत्काळ त्याला जवळील डॉ. योगेश झाल्टे यांच्याकडे उपचारासाठी नेले. उपचारानंतर विद्यार्थी भयभीत अवस्थेत मठात परतल्यावर त्याने शिवाचार्य रत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर महाराजांनी संबंधित शिक्षकाची कानउघडणी केली. या घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत असून मठात राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारची वागणूक मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वृत्त लिहिलेपर्यंत पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. दरम्यान, “सकाळी जिजामाता विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी जखमी अवस्थेत अनिकेत स्वामी या विद्यार्थ्याला माझ्याकडे उपचारासाठी आणले होते. तो रक्तस्त्राव झाल्याने घाबरला होता. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे,” अशी माहिती डॉ. योगेश झाल्टे यांनी दिली.