– दीड वर्षाच्या ‘विश्वराज’चे मातृछत्र हरपले; पाषाणहृदयी पतीसह सासरच्या चौघांना बेड्या!
बिबी (ऋषी दंदाले): माणुसकीला काळिमा फासणारी आणि हुंड्याच्या लोभी राक्षसी प्रवृत्तीचे विद्रूप दर्शन घडवणारी एक धक्कादायक घटना बिबी परिसरात घडली आहे. ‘हुंडा कमी दिला’ आणि ‘गाडीसाठी पैसे आण’ म्हणत सासरच्या नराधमांनी केलेल्या छळाला कंटाळून रोहिणी प्रवीण म्हस्के या २० वर्षीय विवाहितेने मृत्यूला कवटाळले. या क्रूर कृत्यामुळे दीड वर्षाचा चिमुरडा विश्वराज आज पोरका झाला असून, या अभागी बालकाच्या टाहोने उपस्थितांचेही डोळे पाणावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणीचा संसार सुरुवातीला सुरळीत सुरू होता. मात्र, काही काळातच सासरच्या मंडळींमधील ‘हुंडापिसाट’ वृत्ती जागी झाली. पती प्रवीण म्हस्के, सासरे ब्रह्मानंद, सासू विमल आणि दीर प्रदीप यांनी रोहिणीचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. व्यवसायासाठी चारचाकी गाडी घ्यायची आहे, माहेरून एक लाख रुपये घेऊन ये, असा तगादा त्यांनी लावला होता. गरीब बापाने लेकीचा संसार टिकावा म्हणून पदरमोड करून १० हजार रुपये दिलेही, पण या नराधमांची पैशांची हाव काही मिटली नाही.
दि. २ मार्च रोजी या छळाचा अंत झाला. सततच्या त्रासाला कंटाळून रोहिणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. रोहिणीचे वडील परमेश्वर बाबासाहेब मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिबी पोलिसांनी पतीसह सासू, सासरे आणि दिराविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर शिंदे आणि बीट जमादार रविराज चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सुसंस्कृत समाजात हुंड्यासाठी एका तरुण मातेचा बळी जाण्याच्या या घटनेने संपूर्ण बिबी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. रोहिणीच्या जाण्याने तिचा दीड वर्षाचा मुलगा विश्वराज आता आईच्या मायेला कायमचा पारखा झाला आहे. सासरच्या चारही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, मात्र आता घरात कुणीच नसल्याने त्या निष्पाप चिमुरड्याचा सांभाळ कुणी करायचा? हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.