बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) – विदर्भातील आघाडीचे दैनिक देशोन्नतीचे विशेष प्रतिनिधी तथा राज्यातील ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार यांची ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
‘व्हाईस ऑफ मीडिया’ ही संघटना पत्रकारांच्या हितासाठी देश पातळीवर काम करत आहे. कोरोना काळात पत्रकारांसाठी ही संघटना सातत्याने धावून गेली होती. पत्रकारांच्या हक्कासाठी ती विविध पातळीवर लढादेखील देत आहे. सिद्धेश्वर पवार हे वकृत्वाचे धनी असून, सिद्धहस्त पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनीने सातत्याने प्रखड सत्य प्रगट केले आहे. शेतकरी, पीडित, वंचित घटकांसाठी ते आपली लेखनी झिजवत आहेत. राना पवार यांच्यासारख्या सर्वोत्तम पित्याचा वारसा त्यांना लाभलेला आहे. त्यांची या पदावर निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिद्धेश्वर पवार हे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संपादकीय सल्लागारदेखील आहेत.
‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती होताच, ‘देशोन्नती’चे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे, बुलडाणा आवृत्ती संपादक राजेश राजोरे, देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी तथा मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र काळे, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मुख्य संपादक पुरुषोत्तम सांगळे, वरिष्ठ पत्रकार समाधान म्हस्के, विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशाेकभाऊ थाेरहाते, सहसचिव आत्मानंद थाेरहाते आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.