-शहर स्वच्छतेसाठी प्रशासन–नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांचा नवा संकल्प
लोणार (वाजिद खान) : लोणार नगरपरिषदेतील सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समितीचे नवनियुक्त सभापती अब्दुल उबेद अब्दुल मुनाफ यांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी कडक पावले उचलली. लोकनियुक्त नगराध्यक्ष मीरा भूषण मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने दुपारी पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्य विभागात सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन झाडाझडती करण्यात आली.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून शहरात अपेक्षित स्वरूपाची साफसफाई होत नसल्याने नागरिकांमध्ये अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी होती. योग्य नियोजनाअभावी निर्माण झालेल्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहरवासीयांनी दाखविलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्याच दिवशी स्वतः शहरात फिरून व्यापक स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत तुंबलेल्या गटारी साफ करणे, साचलेल्या घाणीवर तातडीची उपाययोजना, रस्त्यांवरील कचरा उचलणे, रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झुडुपे काढणे तसेच विविध ठिकाणी असलेले कचऱ्याचे ढीग हटविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत.
लवकरच नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागावे, स्वच्छ केलेल्या ठिकाणी पुन्हा कचरा टाकू नये तसेच गटाऱ्यांवरील अतिक्रमणांमुळे होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य सभापती अब्दुल उबेद अब्दुल मुनाफ यांनी केले. पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद होते. यावेळी पाणीपुरवठा सभापती अरुण जावळे, नगरसेवक शाम भाऊ राऊत, आरोग्य निरीक्षक योगेश साळवे, आरोग्य सहाय्यक सुनील इरतकर, सामाजिक कार्यकर्ते फैजु भाई तसेच नगरपालिकेचे कर्मचारी अशोक मादनकर, यय्याखान, मधुकर घाटोळे, मनिष वाकोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम भाऊ राऊत यांनी केले तर आभारप्रदर्शन सुनील इरतकर यांनी केले. यावेळी सफाई विभागातील सर्व कर्मचारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.