-श्रद्धा-भक्तीचा संगम : चिखली येथे महिला कीर्तन सोहळा
चिखली (राजेंद्र घुबे) : दिनांक १८ जानेवारी २०२६ ते २५ जानेवारी २०२६ या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे भव्य दिव्य राज्यस्तरीय महिला कीर्तन सोहळा व शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या बाजूला, जिजाऊ कमानीजवळ, बुलढाणा रोड, चिखली येथे संपन्न होणार आहे.
हा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकार व कथावाचक ह.भ.प. रेणुकाताई जाधव तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या माऊली गुरुदेव महिला सेवा समितीच्या सर्व महिला सदस्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत दररोज दुपारी १२ ते ४ या वेळेत भागवताचार्य व कथावाचक ह.भ.प. सौ. रेणुकाताई जनार्धन जाधव (चिखली) यांची शिव महापुराण कथा होणार आहे. तसेच दररोज रात्री ८ ते १० या वेळेत राज्यातील नामवंत महिला कीर्तनकारांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
किर्तनाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहणार आहे –
दि. १८ (रविवार) – ह.भ.प. शिवलीलाताई पाटील (बार्शी)
दि. १९ (सोमवार) – ह.भ.प. भारतीताई गाडेकर (वैजापूर)
दि. २० (मंगळवार) – ह.भ.प. सुनिताताई पाटील ‘अनाथाची माय’ (पाचोरा)
दि. २१ (बुधवार) – ह.भ.प. सुरेखाताई पाटील (शेगाव)
दि. २२ (गुरुवार) – ह.भ.प. रुक्मिणाताई हावरे (जालना)
दि. २३ (शुक्रवार) – ह.भ.प. रेणुकाताई जाधव (चिखली)
दि. २४ (शनिवार) – ह.भ.प. तेजस्विनीताई पाठक (मलकापूर)
यासोबतच दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ९ गीता पारायण यज्ञ, ९ ते ११ गाथा भजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दि. २५ जानेवारी २०२६ (रविवार) रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत ह.भ.प. साध्वी सर्वेश्वरी दीदी (शिवालय आश्रम, नांदुरा) यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, दुपारी २ वाजता महाप्रसाद दिला जाणार आहे. ह.भ.प. रेणुकाताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या माऊली गुरुदेव महिला सेवा समितीमार्फत धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांसोबतच व्यसनमुक्ती, रक्तदान, स्वच्छता अभियान यांसारखे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. या भव्य सोहळ्याचा जिल्ह्यातील व परिसरातील सर्व ईश्वरप्रेमी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. रेणुकाताई जाधव, समितीच्या सर्व महिला सदस्य व प्रसिद्धी प्रमुख विनोद चव्हाण यांनी केले आहे.