– लाल किल्ल्याजवळ चालत्या कारमध्ये झाला बॉम्बस्फोट; मुंबईसह नवी दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाना राज्यांत हायअॅलर्ट जारी!
– पंतप्रधान नरेंद्र मोदींची गृहमंत्री अमित शाहांसोबत चर्चा; गुप्तचर, सुरक्षा यंत्रणांकडून शहराची नाकेबंदी, चौकशी सुरू!
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – देशाची राजधानी नवी दिल्ली भीषण बॉम्बस्फोटाने हादरली आहे. लाल किल्ल्याजवळ चालत्या कारमध्ये हा बॉम्बस्फोट झाला. त्यात १२ जण ठार झाले असून, २५पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. सोमवारी सायंकाळी ६.५२ मिनिटांनी फोर्ट मेट्रो स्टेशनजवळ हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, शेजारी असलेल्या तीन ते चार गाड्यांनीदेखील पेट घेतला होता. बॉम्बस्फोटानंतर पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळाला वेढा देऊन नाकेबंदी केली, तसेच मृत व जखमींना तातडीने नजीकच्या रूग्णालयांत हलवले. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी एनआयए व एनएसजी कमांडोंनीदेखील घटनास्थळी तपास मोहीम सुरू केली असून, सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती घेतली व तपासाच्या सूचना दिल्यात.
नवी दिल्लीचे पोलिस आयुक्त सतिश गोलचा यांनी सांगितले, की आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हळू वेगाने जाणार्या कारमध्ये हा बॉम्बस्फोट झाला. या कारमध्ये प्रवासी होते, त्यांचा मृत्यू तर झालाच पण रस्त्याने असलेल्या इतर वाहनांतील प्रवासीदेखील ठार झाले आहे, तसेच गंभीर जखमी झाले आहेत. निवडणूक प्रचारासाठी असलेले गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून, त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच ते स्वतः तातडीने दिल्लीकडे रवाना झाले होते. हा स्फोट इतका भीषण होता, की या कारसह शेजारून जाणार्या चार ते पाच वाहनांचा चक्काचूर झाला होता. १० ते १२ प्रवासी जागीच ठार झाले असून, जवळपास २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर चांदनी चौक येथील बाजारपेठ बंद करण्यात आली होती. तसेच, सुरक्षा यंत्रणांनी सर्व परिसराचा ताबा घेतला होता.
नवी दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्रातदेखील हाय अॅलर्ट जारी करण्यात आला असून, मुंबईची सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेत सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला.
