– कोयते व गावठी कट्टे तपासणीसाठी व्यापक ‘सर्च ऑपरेशन’ राबविण्याची गरज!
– चौकाचौकात रात्रीच्यावेळी गुंडप्रवृत्तीच्या मुलांच्या टोळ्यांकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न!
अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी) – बोल्हेगाव एमआयडीसी परिसरातील नागरी वस्त्या, गांधीनगर परिसरातील वस्त्या, गणेश चौक ते खाली नदीकाठच्या शिक्षक कॉलेनीपर्यंत गुंडांच्या टोळ्यांनी हौदोस घातला असून, गुंडप्रवृत्तीच्या मुलांच्या टोळ्यांनी सर्वसामान्य नागरिक भयभीत अवस्थेत जीवन जगत आहेत. या गुंडप्रवृत्तीच्या मुलांकडे कोयते व धारदार शस्त्रे असल्याची माहिती हाती येत असून, त्यामुळे नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. काही गुंडांच्या टोळ्यांकडे गावठी कट्टे असल्याचीही माहितीदेखील हाती आली आहे. विशेष करून हा परिसर तोफखाना व एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत येतो. नवरातौैत्सव काळात तर गुंड प्रवृत्तीच्या मुलांकडून निव्वळ धिंगाणा सुरू होता. डीजेला परवानगी नसतानाही डीजे, सीडी लावून धुमाकूळ घालण्यात आला. अनेक तरूण हे गांजा, दारूच्या आहारी गेले असून, परिसरात गुंडगिरी करून दहशत निर्माण करत आहेत. त्यामुळे बोल्हेगाव परिसराचा अक्षरशः बिहार झाल्याचे अतिशय दुर्देवी चित्र आहे.
बोल्हेगाव परिसरातील नागरी वस्त्या, एमआयडीसी परिसर, गांधीनगर परिसरातील वस्त्या, गणेश चौक ते खाली शिक्षक कॉलेनीपर्यंत गुंडप्रवृत्तीच्या मुलांचा धुमाकूळ वाढला आहे. चौकाचौकात किंवा खुल्या मैदानात ही गुंडप्रवृत्तीची मुले रात्रीच्या वेळेस बसत असून, धिंगाणा घालून सार्वजनिक शांतता भंग करत आहेत, तसेच नागरिकांत दहशत निर्माण करत आहेत. यापैकी अनेकांकडे कोयते दिसून येतात, तर काही जणांकडे गावठी कट्टे असल्याचीही माहिती हाती आली आहे. त्यामुळे या परिसरात जोरदार सर्च ऑपरेशन राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. नवरात्रौत्सव काळात तर डीजेचा निव्वळ धुमाकूळ सुरू होता. या गुंडप्रवृत्तीच्या दहशतीमुळे कुणीही नागरिक पोलिसांना फोन करून तक्रार करू शकले नाही. चौकाचौकात व खुल्या मैदानात रात्रीच्या वेळेस टोळ्याच्या टोळ्या बसत असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लेकी-बाळींसह जीव मुठीत धरून घरात बसावे लागत आहे. या मुलांना विरोध केल्यास ही मुले हाणामारी व शिवीगाळ करतात, तसेच वारंवार टार्गेट करत असल्याने नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने बोल्हेगाव हे गुंडमुक्त करून या परिसरात सर्च ऑपरेशन राबवावे, व गुंड प्रवृत्तीच्या मुलांचा व टोळ्यांचा शोध घेऊन त्यांना हद्दपार करावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. तसेच, बोल्हेगाव परिसरात रात्रीच्यावेळेस गस्त वाढवावी, गणेश चौक ते राजमाता-शिक्षक कॉलेनीपर्यंत गस्त वाढवून रात्रीच्या वेळेस टोळ्या करून बसणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही पुढे आली आहे.