– राहुरी पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठला; सखोल चौकशीत निर्घृण खुनाचा झाला पर्दाफास!
– घरी राहणार्या युवकाचा गळा आवळून खून केला; घराच्यामागे खड्डा करून मृतदेह पुरला!
– दवणगावातील दाम्पत्याकडून क्रूरतेचा कळस १४ वर्षाच्या मुलीचे ५० वर्षाच्या व्यक्तीसोबत पैसे घेऊन लग्न लावले!
– १६ वर्षीय मुलीलाही अवघ्या तीन लाखात लग्नाच्या नावाखाली जाणार होते विकले!
अहिल्यानगर/राहुरी (जिल्हा प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील बजरंग कारभारी साळुंखे (वय ३९), शीतल बजरंग साळुंखे (वय ४०) या दाम्पत्याला अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार व लैंगिक शोषण प्रकरणी राहुरी पोलिसांनी अटक केल्यानंतर या दाम्पत्याच्या पोलिस कोठडीतील चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. या दाम्पत्याने त्यांची घरी राहणार्या एका निराधार तरूणाचा गळा आवळून खून केला, तसेच त्याचा मृतदेह घरामागे खड्डा खोदून पुरून टाकला. पोलिस चौकशीत ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पुरलेला मृतदेह उकरून काढला असून, पंचनामा व उत्तरीय तपासणी करून नगरपालिकेच्या सहाय्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर या दाम्पत्याने १४ वर्षाच्या मुलीचे ५० वर्षाच्या व्यक्तीसोबत पैसे घेऊन लग्न लावून दिले, नंतर तिलाही घरी घेऊन आले. तर एका १६ वर्षाच्या मुलीला तीन लाख रूपयात लग्नाच्या नावाखाली विकण्याची तयारी सुरू होती. परंतु, तत्पूर्वीच त्यांच्या पापाचा घडा फुटला आहे.
सविस्तर असे, की अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेच्या स्वयंसेवक पूजा दहातोंडे यांनी दिनांक १७ सप्टेंबररोजी रात्री ९.०० वाजेच्या सुमारास राहुरी पोलिस स्टेशन येथे दिलेल्या माहितीवरून चार अल्पवयीन पीडित मुलींची सुटका करत लैंगिक अत्याचार करणारे दाम्पत्य बजरंग कारभारी साळुंखे (वय ३९), शीतल बजरंग साळुंखे (वय ४०) दोघे राहणार दवणगाव, तालुका राहुरी यांना दि.१८ सप्टेंबररोजी अटक करण्यात आली होती. तर सदर दाखल गुन्ह्यातील आरोपी नीलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर (वय ३२) राहणार राहता यास अटक करणे बाकी होते. अटक आरोपीच्या मदतीने पाहिजे असलेल्या आरोपीस अटक करण्याकरिता व इतर तपासा करिता अटक दाम्पत्यास दि.१९ सप्टेंबररोजी न्यायालयापुढे हजर करून त्यांची दिनांक २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली होती. पोलिस तपासादरम्यान सदर दाम्पत्याने मुलींपैकी एका अल्पवयीन मुलीचे (ती १४ वर्षाची असताना) पन्नास वर्षीय व्यक्तीसोबत पाच वर्षापूर्वी लग्न लावून एक लाख रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे व नंतर परत तीन महिन्याने तिला आपल्याकडे राहण्यासाठी आणले. तर दुसर्या मुलीचे (१६ वर्ष वय) अल्पवयीन असताना लग्न लावून देण्यासाठी तीन लाख रुपये घेतलेले असल्याचे तपासात समजलेले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असताना पोलिस कस्टडी रिमांडमध्ये अटक आरोपींकडे पाहिजे असलेला आरोपी नीलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर याच्याबाबत विचारणा केली असता सुरूवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु आज (दि.२३) अटकेतील आरोपींकडे कसून चौकशी केली असता, बजरंग कारभारी साळुंखे याने गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी नीलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर याने मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याच्या कारणाने मार्च २०२५ मध्ये एके दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या राहतेघरी गळा दाबून खून करून त्याचा मृतदेह ज्या खोलीत त्याचा खून केला तेथेच रात्री दहापर्यंत ठेवून, रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान राहते घरामागे खड्डा खोदून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पत्नीच्या साह्याने पुरून लपवून ठेवल्याचे सांगितले. या माहितीवरून भारतीय न्यायसंहिता कलम १९६ अन्वये सदर माहितीची खातरजमा करणे कामी राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट श्रीमती संध्या दळवी यांना पाचरण करून दोन पंचासमक्ष अटक आरोपीने दिलेल्या निवेदनाप्रमाणे खात्री केली असता, दुपारी १२.०० ते दोन वाजेदरम्यान आरोपीने दाखवलेल्या ठिकाणी देवळाली नगरपालिकेच्या कर्मचार्यांच्या मदतीने माती उकरून पाहिले असता मृतदेह मिळून आला. मृत आरोपी नीलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर हा राहता येथील राहणारा असून, त्याचे आई-वडील मयत झालेले असल्याने तो अटक दाम्पत्याकडेच राहत होता. त्यामुळे त्याची कुठेही मिसिंग किंवा हरवल्याबाबतची तक्रार देण्यात आलेली नसल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.
तरी मृतदेहाची दवणगाव येथील स्थानिकांच्या मदतीने तो नीलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर याचाच असल्याची खात्री करण्यात आली आहे. सदर मृतदेह फॉरेन्सिक तपासणीकामी प्रायमरी हेल्थ सेंटरचे वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर तहा खान व प्रसाद मासाळ यांच्यामार्फत पोस्टमार्टम करून अंत्यविधीकरिता त्याचे नातेवाईक नसल्याने दवणगाव ग्रामपंचायत यांच्या ताब्यात देऊन त्यांच्या मदतीने सरकारी पंचांसमक्ष अंत्यविधी करण्यात आलेला आहे. सदर बाबत राहुरी पोलिसांच्यावतीने पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरचाr कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलिस स्टेशन यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव, पोहेकॉ. सुरज गायकवाड, राहुल यादव, शकूर सय्यद, अशोक शिंदे, पोकॉ. गणेश लिपणे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुर्हाडे, अजिनाथ पाखरे, गोवर्धन कदम. मपोकॉ. मीना नाचन, वंदना पवार, शिवानी गायकवाड, अंजली गुरवे यांनी केली.