– राहुरी पोलिसांच्या ‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत चार लैंगिक अत्याचारग्रस्त मुलींची सुटका!
अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी) – आई व वडिल विभक्त झाल्याने परजिल्ह्यातील चार अल्पवयीन मुलींना दूरच्या नातेवाईकाकडे सुपूर्त करण्यात आले. परंतु, या नातेवाईक दाम्पत्यानेच या मुलींवर लैंगिक अत्याचार सुरू केले. या घटनेची माहिती स्नेहालय संस्थेच्यावतीने मिळताच, राहुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या मुलींची मुक्तता केली. तसेच, मुलींचा लैंगिक छळ करणार्या दाम्पत्यास अटक करण्यात आली आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत राहुरी पोलिसांनी ही कारवाई केली.
सविस्तर असे, की काल (दि.१७) रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहुरी पोलीस स्टेशन येथे उडान फाउंडेशन संचलित स्नेहालय संस्था अहिल्यानगर येथील स्वयंसेवक पूजा दहातोंडे यांनी माहिती दिली, की राहुरी तालुक्यामध्ये एका ठिकाणी चार अल्पवयीन पीडित मुलींवर लैंगिक अत्याचार करणारे दाम्पत्य राहत असून, सदर मुलींवर मागील तीन ते चार वर्षापासून लैंगिक अत्याचार सुरू आहेत. पैकी सदर चार बहिणींपैकी एक सज्ञान झाल्याने व तिला याबाबत समज आल्याने तिने सदरची बाब स्नेहालय संस्थेला सांगितली. स्नेहालयाच्या स्वयंसेवक पूजा दहातोंडे यांनी तात्काळ राहुरी पोलिस स्टेशन येथे धाव घेत, उर्वरित १६ वर्ष, १४ वर्ष व १० वर्ष वयाच्या तिन्ही मुलींची सदर अत्याचारामधून सुटका करणेबाबत माहिती दिल्याने, राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव, पोहेकॉ. राहुल यादव, शकूर सय्यद, पोकॉ. गणेश लिपणे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुर्हाडे, मपोकॉ. मीना नाचन, वंदना पवार यांचे पथक तयार करून पोलिस पथकासह कार्यकारी दंडाधिकारी सोपान बाचकर व पंचासमक्ष मिळालेल्या माहितीची खात्री करून चारही पीडित मुलींची रात्री साडेबारा वाजता सुटका केली. तसेच, पीडित मुलींचे समुपदेशन करून त्यांना स्नेहालय संस्थेमध्ये पहाटे पाच वाजता दाखल केले. तसेच, आरोपीविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम ३७६, ३७६(२) (ह) व पोस्को कलम ४,८,१२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी बजरंग कारभारी साळुंखे वय ३९ वर्ष, शीतल बजरंग साळुंखे वय ४० वर्ष दोघे राहणार दवणगाव, तालुका राहुरी यांना अटक केली. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव व गणेश लिपने हे करत आहेत. ऑपरेशन मुस्कानदरम्यान गेल्या वर्षभरात अपहरित तसेच लैंगिक अत्याचारातील एकूण ८६ मुलींची सुटका करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भावर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव, पोहेकॉ. राहुल यादव, शकूर सय्यद, पोकॉ. गणेश लिपणे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुर्हाडे, मपोकॉ. मीना नाचन, वंदना पवार, शिवानी गायकवाड, अंजली गुरवे यांनी केली.