– वनमंत्री गणेश नाईक यांचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना ठोस आश्वासन; मंत्रालयात पार पडली महत्वपूर्ण बैठक!
– जंगली जनावरांच्या त्रासापासून शेतीपिके वाचण्यासाठी मजबूत कंपाऊंड करून द्या; पीकनुकसानीची १०० टक्के भरपाई द्या – रविकांत तुपकर
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – जंगली जनावरांपासून शेतीपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतकर्यांचे नुकसान टाळण्यासाठी जे जे शक्य होईल ते करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत, असा शब्द राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना दिला. मुंबई येथे मंत्रालयात आज (दि.१२) विशेष बैठक पार पडली. या बैठकीत जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. माकडे पकडून ते अभयारण्यात सोडण्याचे कंत्राट समाधान गिरी व त्यांच्या टीमला देण्यात आले असून, त्याचा खर्च राज्य सरकार उचलेल, त्यामुळे शेतीपिकांचे माकडांपासून होणारे नुकसान रोखले जाईल. तद्वतच पीक नुकसान भरपाई देण्यास सरकार तयार असल्याची ग्वाहीही वनमंत्र्यांनी तुपकर यांना यावेळी दिली.

राज्यभरात जंगली जनावरांचा शेतीपिकांना प्रचंड त्रास वाढला आहे. माकडे, रोही, रानडुक्कर, हरीण, काळवीट, नीलगाई आदी वन्यप्राण्यांचा पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. हे वन्यप्राणी पिके उद्ध्वस्त करत असल्याने राज्यभरात पिकांचे ३० ते ४० टक्के नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या गंभीर प्रश्नाबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर गेल्या काही वर्षापासून सातत्याने सरकार दरबारी मागणी करीत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वीदेखील या संदर्भात त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र देऊन याबाबतीत उपायोजना करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती, आणि या बैठकीसाठी तुपकर यांनादेखील विशेष आमंत्रित करण्यात आले होते. आज मंत्रालयातील सातव्या मजल्यावर वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला वनविभागाचे प्रधान सचिव व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर, माजी मंत्री राजेश टोपे, आ.प्रताप अडसड, आ. तानाजीराव मुरकुटे यांचीदेखील प्रामुख्याने उपस्थित होती. यावेळी रविकांत तुपकर यांनी जंगले जनावरांपासून शेतीपिकांच्या होणार्या नुकसानीबाबत सविस्तर माहिती दिली व हा प्रश्न किती गंभीर आहे हे पटवून दिले.
पीकविम्याच्या अत्यल्प रकमेवरून रविकांत तुपकर आक्रमक!
शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास सुरुवात झाली परंतु त्यामध्ये मोठा घोळ दिसून येत आहे. सन 2024 चा पिक विमा आधीच उशिरा देण्यात येत आहे आणि त्यातही अनेक शेतकऱ्यांना 19 रुपये 24रु,74रु,90रु आणि शंभर रुपये अशी अगदी अत्यल्प आणि तुटपुंजी रक्कम मिळाली आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान असून भारतीय कृषी कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, शेतकऱ्यांचा अपमान कदापिही सहन केला जाणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत रविकांत तुपकर यांनी आज 12 सप्टेंबर रोजी मंत्रालयात अप्पर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी व कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. काही शेतकऱ्यांना समाधानकारक रक्कम मिळाली तर काही शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी रक्कम मिळाली, नेमक्या कोणत्या कायद्याने कोणत्या आधारावर ह्या रकमा देण्यात आल्या असाव्यात..?? असा संतप्त सवाल उपस्थित करून रविकांत तुपकर यांनी हा प्रश्न तातडीने मार्गे न लावल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.
ठीकठिकाणी माकडांनी हैदोस घालून अनेक पिके नष्ट केली असल्याचे त्यांनी सांगताच, हैदोस घालणार्या आणि शेतातील पिकांचे नुकसान करणार्या माकडांना पकडण्यासाठी राज्य शासनाने समाधान गिरी व त्यांच्या टीमची निवड केली असून, त्यांना माकडे पकडण्याचा कंत्राट दिला आहे. प्रति माकड सहाशे रुपये याप्रमाणे मानधन देऊन राज्यभरात माकडे पकडण्याचे काम समाधान गिरी करणार आहेत, ही माकडे पकडून अभयारण्यात सोडली जाणार आहेत. यासाठी वनविभागाकडून त्यांना परवानगी दिली जाणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी या बैठकीत दिली.
रोही, रानडुकरे, हरीण, काळवीट, नीलगाई या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतीला बांबूच्या मजबूत कुंपनाची योजना सरकार आणणार असल्याचे ना. नाईक यांनी सांगितले. परंतु सौरऊर्जेचे कंपाउंड अत्यंत तकलादू असून, ते शेतकर्यांसाठी निकामी असल्याचे रविकांत तुपकर यांनी बैठकीत पटवून दिले. जंगली जनावरांच्या नुकसानीचा विषय अत्यंत गंभीर असून, यासंदर्भात राज्य सरकारने किमान पाच वर्षे मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी बैठकीत मांडली असता, वनमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यकतेनुसार उपाययोजना राबवण्यास राज्य सरकार व वन विभाग सकारात्मक असल्याचे सांगितले. या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी जंगल व शेतीच्या बांधावर बांबूचे मजबूत कुंपन करण्याचा निर्णय सरकार घेणार असून, तोपर्यंत झालेली पिकांची नुकसान भरपाई भरीव व तात्काळ देऊ, अशी माहिती देत याबाबत अंमलबजावणी करण्याची ठोस आश्वासन ना. नाईक यांनी रविकांत तुपकर यांना दिले. हवे तर शेतकर्यांकडून काही रक्कम घ्या, परंतु शेतीला मजबूत कंपाउंड द्या, असे तुपकर यांनी म्हटले असता बांबूचे मजबूत कंपाउंड तयार केल्यास जनावरांचा त्रास कमी होऊन शेती पिकांचे संरक्षण होईल, त्यामुळे ही योजना प्राधान्याने राबवू , असे नामदार नाईक यांनी आश्वासन दिले.
जनावरांपासून शेतीपिकांचे होणारे नुकसान आणि त्यातून उत्पन्नात येणारी घट हा प्रश्न आता क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून काही प्रमाणात पुढे सरकल्याचे सकारात्मक चित्र या बैठकीतून समोर आले. माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार प्रताप अडसड आमदार तानाजीराव मुरकुटे यांनीदेखील या संदर्भात बैठकीत विविध मुद्दे उपस्थित करून चर्चा केली.
