– चर्चमध्ये जाण्याचे बंद केल्याने जीवे मारण्याची धमकी; शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल
– नगर जिल्ह्यात धर्मांतराचा प्रश्न गंभीर; हिंदूत्ववादी संघटनांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी
अहिल्यानगर/ शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – पुतण्याचा आजार बरा करतो, असे सांगून एका महिलेस चर्चमध्ये बोलावून प्रार्थना करायला व ख्रिश्चन धर्माप्रमाणे रहायला सांगून नातेवाईकांनाही चर्चमध्ये यायला लावले. दरम्यान, या महिलेसोबत अश्लील वर्तन करणार्या, अनेक दिवस खेट्या घालूनही गुण नसल्याने चर्चमध्ये जाणे बंद केल्यावर तिला जीवे मारण्याची व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणार्या शेवगाव येथील आखेगाव रोडवरील ‘आशीर्वाद प्रार्थना भवन होली स्पिरीट जनरेशन’ चर्चचा प्रमुख प्रदीप प्रभाकर कोल्हे याच्याविरुद्ध अखेर पीडित महिलेने मागील सोमवारी (दि.४) शेवगाव पोलिसात गंभीर आरोप करत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेबाबत परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, शेवगावसह नेवासा, पाथर्डी तालुक्यात धर्मांतराचे जोरदार प्रकार सुरू असून, त्याला भोळीभाबडी कुटुंबे बळी पडत असल्याने हे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूत्ववादी संघटनांनी तातडीने पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. या भागात धर्मांतर हा गंभीर प्रश्न निर्माण होऊन बसला आहे.
याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपला पुतण्या हा २०१४ पासून आजारी असून, प्रदीप कोल्हे याने आपल्या घरी येऊन आपण त्यास बरा करतो, त्यासाठी तुम्ही चर्चमध्ये या, प्रार्थना करा, ख्रिश्चन धर्माप्रमाणे रहा, असे सांगितले. पुतण्याच्या बरे होण्याच्या आशेने आपण कुंटुबासह त्याच्या चर्चमध्ये जाण्यस सुस्वात केली. प्रदीप कोल्हे याने उपचार करण्याच्या बहाण्याने आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेत चर्चमध्ये डोळे बंद करण्याचे सांगून पीडितेच्या पाठीवर, मानेवर हात फिरवणे, पदर काढणे व हात पकडणे अशी लजास्पद कृत्ये केली. त्याचप्रमाणे नातेवाईकांनादेखील चर्चमध्ये आणा, नाही तर उपचार करणार नाही, असे म्हणत धार्मिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पीडित कुटुंबाने चर्चमध्ये जाणे बंद केले, तेव्हा आरोपी कोल्हे याने अत्यंत घाण शिवीगाळ करत, आपणास जीवे मारण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली, असे सदर महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
शेवगाव तालुक्यासह नजीकच्या नेवासा व पाथर्डी तालुक्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालत धर्मांतराचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्याला भाबडा व गोरगरीब हिंदू समाज बळी पडत आहे. यास्तव, नेवासा, कुकाणा, शेवगाव या भागातील धर्मांतराच्या घटनांवर हिंदूत्ववादी संघटनांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. वेळीच हे धर्मांतर रोखले गेले नाही तर हिंदू समाजाची अपरिमीत हानी होण्याचा धोका पाहाता, हिंदू संघटनांनी तातडीने हालचाली कराव्यात, अशी मागणी जनमाणसातून पुढे आली आहे.