– आमदार सिद्धार्थ खरात, आ. मनोज कायंदे यांनी विधानसभेत उठवला आवाज, शेतकर्यांच्या आशा पल्लवित!
– शेतकर्यांवर पेरणीचे संकट; शेतकर्यांच्या मानेवरील परिस्थितीचे ‘जू’ आणि आणखी घट्ट!
– नुकसानीसाठी तातडीच्या मदतीची गरज, ५०० कोटीचे विशेष पॅकेजही हवेच!
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे)- मेहकर व लोणार तालुक्यात २५ व २६ जूनरोजी ढगफुटीसदृश पाऊस पडला, या पावसाच्या प्रलयाने जवळ जवळ लाखाच्यावर एकरातील पीक पूर्णतः मातीत गेली. नदी, नाल्यांना आलेल्या महापुराने जमीन खरडून गेली असून, दुबार पेरणीचे संकटही ओढवले आहे. संकटाची मालिका संपता संपत नसल्याने, शेतकर्याच्या मानेवरील परिस्थितीचे ‘जू’ आणखी घट्ट होत असल्याचे दिसून येते आहे. तरी नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीची मदत करावी, तसेच या दोन्ही तालुक्यासाठी ५०० कोटीचे विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी काल, दि. २ जुलैरोजी विधानसभेत लक्षवेधीद्वारे लावून धरली. या चर्चेत सहभागी होत आ. मनोज कायंदे यांनीही शेतकर्यांना तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा पोटतिडकीने विधानभवनात मांडला.
आ. खरात म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यात २५ व २६ जून रोजी अतिवृष्टी झाली. यामध्ये मेहकर व लोणार तालुक्यात याची तीव्रता जास्त होती. या तालुक्यात २०० मिमीचे वर पाऊस झाला. या ढगफुटीसदृश पावसाने मेहकर व लोणार तालुक्यातील लाखाच्यावर एकरावरील पिके मातीत गेली. काच, पैनगंगा, उतावळीसह इतर नद्या,नाले यांना महापूर गेल्याने मोठ्या प्रमाणात जमीनसुद्धा खरडून गेली, पाईप, स्प्रिंकलरसह इतरही अवजारे पाहून गेली. तर हजारो हेक्टरवरील दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्याचबरोबर रस्ते, पूल, तलाव, बंधारे, विद्युत पोल, केबल आदींचेही मोठे नुकसान झाले आहे. संकटावर संकटे येत असल्याने, शेतकर्याच्या मानेवरील परिस्थितीचे ‘जू’आणखी घट्ट होताना दिसून येत आहे. तरी शासनाने एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून नुकसानीसाठी तातडीची मदत द्यावी. तसेच या आपत्ती साठी ५०० कोटीचे विशेष पॅकेजही द्यावे, अशी मागणीही आमदार सिद्धार्थ खरात यांनी लक्षवेधीद्वारे विधानभवनात लावून धरली. या महत्त्वाच्या चर्चेत सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे, रिसोडचे आमदार अमित झनक, आमदार रोहित पवार हेसुद्धा सहभागी झाले होते. एकंदरीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानभवनात पोटतिडकीने लावून धरल्याने, शेतकर्यांच्या मदतीच्या अशा पल्लवी झाल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील काय निर्णय घेतात याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून आहे.