– तातडीने पीकविमा भरपाई द्या, अन्यथा मुंबई गाठून तीव्र आंदोलन; तुपकरांचा एआयसी कंपनीला इशारा!
– पीकविमा मिळणार नाही तोपर्यंत उठणार नाही; सहदेव लाड यांनी कृषी विभागाला ठणकावले!
बिबी/लोणार (ऋषी दंदाले) – बुलढाणा जिल्ह्यातील सन २०२३ व २०२४ चा हजारो शेतकर्यांचा पीकविमा अजूनही प्रलंबित आहे. शेतीपिकांचे नुकसान होऊनही अनेक शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित असल्याने शेतकर्यांमध्ये असंतोष आहे. ‘त्या’ अन्यायग्रस्त शेतकर्यांना तातडीने पीकविमा मिळावा, यासाठी अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया,लि. मुंबईच्या कार्यालयात राज्याचे क्षेत्रीय व्यवस्थापक बी. प्रभाकर यांची क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज भेट घेऊन राहिलेल्या विमा भरपाई बद्दल सविस्तर चर्चा केली व लवकरात लवकर पीकविमा न मिळाल्यास शेतकर्यांना घेऊन मुंबई गाठू व कंपनीवर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पीकविमा कंपनीला दिला. दुसरीकडे, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी लोणार कृषी कार्यालय गाठून पीकविम्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले असून, जोपर्यंत उर्वरित शेतकर्यांना पीकविमा मिळत नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशा इशारा लाड यांनी दिला आहे.

२०२३- २०२४ चा खरीप व रब्बी हंगामाचा पीकविमा काही शेतकर्यांना मिळाला तर काही शेतकर्यांना अतिशय अल्प मदत मिळालेली आहे, तर उर्वरित बर्याच शेतकर्यांना अद्यापपर्यंत पीकविम्याची रक्कम मिळालेली नाहा. या उर्वरित शेतकर्यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी आज लोणार तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली. तर नुकसान होऊनही अनेक शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित असल्याने शेतकर्यांमध्ये असंतोष आहे. ‘त्या’ अन्यायग्रस्त शेतकर्यांना तातडीने पीकविमा मिळावा, यासाठी अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया,लि. (एआयसी) मुंबईच्या कार्यालयात राज्याचे क्षेत्रीय व्यवस्थापक बी. प्रभाकर यांची शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज भेट घेऊन राहिलेल्या पीकविमा भरपाईबद्दल सविस्तर चर्चा केली. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील एआयसी विमा कंपनी कडे येणार्या इतर जिल्ह्यांतील शेतकर्यांनाही नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी तुपकरांनी केली. भरपाई लवकर मिळाली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना नुकसानग्रस्त शेतकर्यांना घेऊन एआयसीच्या मुंबई कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन करेल, असा कडक इशारा यावेळी तुपकरांनी दिला.

मागील दोन वर्षापासून आस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकर्यावर फार मोठे संकट ओढावले आहे. गेल्या दोन वर्षापासून कधी पावसाच्या उघडझापीमुळे तर कधी अतिपावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. दुसरीकडे, शासनाच्यावतीने शेतकर्यांनी कबाडकष्ट करून पिकवलेल्या शेतमालालासुद्धा योग्य भाव नाही. असे असताना सन २०२३-२०२४ चा पीकविमा शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात भरला होता. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पीकविमा कंपनीच्यावतीने शेतकर्यांची थट्टा सुरू आहे. काही शेतकर्यांना पीकविम्याची रक्कम बर्यापैकी आली तर काही शेतकर्यांना अतिशय कमी प्रमाणात ही रक्कम मिळाली. तर बर्याच शेतकर्यांना अद्यापपर्यंत पीकविम्याचा एक रूपयापण आला नाही. तरी उर्वरित सर्व शेतकर्यांना पीकविमा मिळावा, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या नेतृत्वात लोणार तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनामध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत पीकविमा मिळणार नाही, तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही, अशी भूमिका सहदेव लाड यांनी घेतली आहे. त्यांच्यासोबत अनिल लांडगे, संजय महाजन या कार्यकर्त्यांसह शेतकरीदेखील ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.