– नागरी समस्यांनी त्रस्त झालेल्या युवकांचे नगरपरिषदेत ‘गांधीगिरी’ आंदोलन!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर शहरामध्ये नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. जनता त्रस्त झाली आहे, या संदर्भात काही युवकांनी पुढाकार घेऊन ते नगरपालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने आलेल्या युवकांनी मुख्याधिकार्यांच्या रिकाम्या खूर्चीचा शाल हार व श्रीफळ देऊन मानसन्मान केला तर संबंधित कर्मचार्याला निवेदन दिले, व आमच्या वॉर्डातील समस्या जर दोन-तीन दिवसात सुटल्या नाही तर आम्ही नगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करू, असा इशारासुद्धा या युवकांनी दिला.
युवकांच्या या शिष्टमंडळात मारुती मुळे, शिवकुमार घारगे, नंदू बंगाळे, विशाल मस्के, सुनील डोईजड, मोहन ओव्हर, कार्तिक घुगे, रोहन बंगाळे सर्व राहणार महादेव वेटाळ , गणपती गल्ली, मळा बँक, दत्त मंदिर परिसर यांचा समावेश होता. या युवकांनी २४ जूनरोजी नगरपालिकेमध्ये येऊन निवेदन दिले. निवेदनानुसार, या भागामध्ये १५ ते १६ दिवस झाले नळाला पाणी आलेच नाही, जे काही पाणी येते ते १५ ते २० मिनिटे येत आहेत. नळाला गढूळ पाणी येत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामदेवता शीतला माता मंदिर या ठिकाणी बाराही महिने घाणपाणी साचून आहे. या परिसरात असलेल्या नाल्यांमध्ये घाण साचली आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे व इतरही मूलभूत सुविधा या परिसरात निर्माण झाल्या आहेत. फोनद्वारे वेळोवेळी नगरपालिकेच्या संबंधित कर्मचार्यांना सूचना केलेल्या होत्या, मात्र एकही कर्मचारी ऐकत नाही. वेळेवर समस्या सुटत नाहीत. पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने विकत पाणी घ्यावे लागते. पंधरा पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही. कचरा गाड्यासुद्धा आमच्या वॉर्डात येत नाहीत. अशी बिकट परिस्थिती नागरिकांची झाली आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाकडून मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ठोस अशी उपाययोजना होत नाही. जनता त्रस्त झाली आहे, अशा परिस्थितीत संबंधित युवकांनी नगरपालिकेला निवेदन दिले. यावेळी मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या युवकांनी मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या रिकाम्या खुर्चीला शाल घातली हार टाकला व नारळ देऊन रिकाम्या खूर्चीचा मान सन्मान केला. सध्या आम्ही गांधीगिरी मार्गाने शांततेने आंदोलन करत आहोत, व आमच्या मागण्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी आपणाकडे लोकशाही मार्गाने निवेदन देत आहोत. मात्र जर लवकरात लवकर आमच्या मागण्या सोडविल्या नाही तर आम्ही नगरपालिकेच्या विरोधात अन्नत्याग आंदोलन करू, असा इशारा मारुती मुळे, शिवकुमार घारगे, नंदू बंगाळे, विशाल मस्के, सुनील डोईजड, मोहन ओव्हर, कार्तिक घुगे, रोहन बंगाळे व इतरांनी नगरपालिकेला दिला आहे. त्यामुळे आता नगरपालिका नागरिकांच्या समस्या सोडविणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.