– साखरखेर्डा येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित मेघानंद जाधव यांच्या गायनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साखरखेर्डा येथील एसईएस हायस्कूलच्या मैदानावर गायक मेघानंद जाधव यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पलसिध्द कंन्सट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा साहेबराव काटे महाराज हे होते. तर केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव, माजी समाजकल्याण सभापती बाबुरावजी मोरे, ठाणेदार गजानन करेवाड, माजी उपसरपंच रामदाससिंह राजपूत, अमित जाधव, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे तालुका विषेश प्रतिनिधी अशोक इंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे, माजी उपसरपंच आयुब कुरेशी, अहमद कुरेशी, केंद्रप्रमुख कैलास ढोलेकर आदी उपस्थित होते.
जिजाऊ, सावित्री, रमाई होऊन समाज घडविण्याचे काम महिलांनी केले पाहिजे. जिजाऊ माँसाहेब यांनी शिवबाच्या हाती सोन्याचा नांगर देऊन उजाड पुणे घडविण्याचे धडे दिले. तर सावित्रीबाई फुले यांनी हातात पुस्तक घेऊन महिलांना शिक्षणाची दारे खुली केली. रमाबाई आंबेडकर यांनी स्वत: उपाशी राहून बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली. त्यांचे कार्य समाजासमोर मांडले पाहिजे. तर या मातांची किंमत कळेल, असे आवाहन आपल्या गीतातून मेघानंद जाधव यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दोनच राजे होऊन गेले, या गीताच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य कसे उभे केले, आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून संविधानाची निर्मिती कशी केली, त्याचा फायदा बहुजन समाजाला कसा झाला, याचा उलगडा करीत आपले सादरीकरण केले. महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही, असे प्रबोधन जाधव यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे माजी सभापती राजेश ठोके, उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष गवई, उपाध्यक्ष अरुण गवई, दर्शनकुमार ज्ञानेश्वर गवई, बी के गवई, दिलीप इंगळे, संदीप खिल्लारे, गजानन गवई, सुमित गवई, ईश्वर गवई, विजय कंकाळ, मिलिंद गवई, राहुल गवई, यश इंगळे, किरण गवई, पंकज गवई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.