– ‘बालाजी अर्बन’च्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांकडून गुन्हे दाखल करून तपासाला सुरूवात!
– सोनारासह काही ठगांनी नकली सोने गहाण ठेवल्याचे बँकेच्या वेळीच का लक्षात आले नाही?
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – बालाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली, शाखा साखरखेर्डा येथील शाखेतून बनावट सोने तारण ठेऊन कर्ज घेतल्याचे उघडकीस येताच, मुख्य व्यवस्थापक यांच्या तक्रारीवरुन साखरखेर्डा पोलिसांनी काल, दि. ११ मार्चरोजी सोनारासह पाच आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार सर्वप्रथम ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने चव्हाट्यावर आणल्याने एकच खळबळ उडाली होती.
नकली सोने गहाण ठेवून येथील बालाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची एकूण ५९ लाख २७ हजार ५०० रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पाच आरोपींवर महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ०३ सह भारतील न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. सदर घटना दिनांक १६/०७/२०२४ चे १०.०० वाजेच्या ते १३/०२/२०२५ चे १८.०० वाजे दरम्यानची आहे. याबाबत फिर्यादी अनिल केशवराव गाडे, वय ४८ वर्ष, व्यवसाय नोकरी, जनरल मॅनेजर बालाजी अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसायटी लिमीटेड, चिखली, रा. राऊतवाडी फुलझाडे यांचे चक्कीजवळ चिखली, जिल्हा बुलडाणा यांनी येथील पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी १) सोनार अजिंक्य दिलीप शहाणे वय ३८ वर्ष, मु. पो साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा याच्यासह २) राजु प्रभाकर केंधळे, वय ४५ वर्ष, मु. पो सवडद, ता. सिंदखेडराजा, जिल्हा बुलडाणा रक्कम १८ लाख ४० हजार ५०० रूपये, ३) भगवान सुभाष शहाणे, वय ३९ वर्ष, मु. पो साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा, जिल्हा बुलडाणा रक्कम १५ लाख १८ हजार, ४) प्रदीप नामदेव आवचार, वय ४५ वर्ष, मु. पो साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा, जिल्हा बुलडाणा रक्कम ६ लाख ५० हजार, ५) गोपाल रंगनाथ पाझडे, वय ३८ वर्ष, मु. पो. साखरखेर्डा, ता.सिंदखेडराजा, जिल्हा बुलडाणा रक्कम १९ लाख १९ हजार रूपये असे या पाच खातेदारांनी बालाजी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, शाखा साखरखेर्डा यांची नकली सोने तारण ठेवून लाखो रूपयांची फसवणूक केली असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत बालाजी अर्बनच्या अधिकार्यांनी येथील साखरखेर्डा पोलिस स्टेशनमध्ये ता.१४ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. सदर प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनासाठी पोलिसांनी तक्रार चौकशीवर ठेवली होती. पोलिसांनी बँक प्रशासनास अशा प्रकारची फसवणुकीची आणखी काही गैरप्रकार आहेत का, यांचा शोध घेण्यास सांगितले होते. तसेच सदर तक्रारीबाबत वरिष्ठांना कळवून सध्या तक्रार चौकशीवर ठेवून वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार येईल, असे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सांगितले होते.
साखरखेर्डा येथे बालाजी अर्बन को– ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली यांची एक शाखा आहे. ही पतसंस्था अल्प व्याजदराने किरकोळ व्यापारी, लहान व्यापारी यांना कर्ज देते. तसेच सोने तारणावरसुध्दा कर्ज देते. बँकेच्या प्रशासनाने २०१९ साली किंवा त्या अगोदर साखरखेर्डा येथील एका सोनारासोबत करारनामा करून त्यांना सोने मूल्यांकन म्हणून नियुक्त केले होते. या सोनाराने सोने शुध्दतेचे मूल्यांकन करून किमान २५ ते ३० व्यापार्यांनी सोने तारण कर्ज उचलले असल्याचे कळते. काही कर्जदार व्यापार्यांना याबाबत कुणकूण लागताच आणि सोसायटीने वसुली नोटीस बजावताच आपली व्यापारी प्रतिष्ठा खराब होऊ नये म्हणून सोने तारण कर्ज भरणा केला. कर्जाचा भरणा केल्यानंतर बँक मॅनेजर यांनी बँकेमध्ये ठेवलेले गहाण सोने ग्राहकांना परत केले. तेव्हा सदर सोने हे नकली असल्याचे निदर्शनास आले. ज्यांची स्वतःची कोणतीही ऐपत नाही, स्वत:चे घर नाही, बायको नाही, अशा लोकांच्या नावे ५० लाख ते एक कोटी रुपयांच्या घरात सोने तारण कर्ज घेतल्याचे सोसायटीच्या लक्षात यायला पाहिजे होते. नेमकं सोनं खरे की खोटे याची योग्य पडताळणी करायला पाहिजे होती. या गैरप्रकारात कर्जदार, सोनार आणि आणखी कोण कोण सामील आहेत, ही बाब चौकशीअंती समोर येणार आहे. बालाजी अर्बन सोसायटीच्या बँकेच्या अधिकार्यांनी ता.१४ फेब्रुवारीला त्या सर्व कर्जदार, व्यापारी आणि व्यक्ती व सोनार यांच्या नावाने साखरखेर्डा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या कर्जदारांनी कर्ज थकविल्याने बँकेचे अधिकारी कर्जदारांकडे वसुलीसाठी जावू लागले तेव्हा कर्जदार कर्ज भरण्यासाठी टाळाटाळ करू लागले. जेव्हा थकीत कर्जदारांकडे वसुलीसाठी अधिकारी गेले तेव्हा सोसायटीची फसवणूक झाली असल्याचे बँकेच्या लक्षात येताच त्यांनी येथील पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी नकली सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे, त्यांचे धाबे दणाणले होते. आता हे नकली सोने गहाण प्रकरण आणखी कोणते वळण घेते आणि यात आणखी कोण कोण आहेत, याकडे साखरखेर्डासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. पुढील तपास ठाणेदार एपीआय गजानन करेवाड (ठाणेदार) पो.स्टे. साखरखेर्डा हे करीत आहेत.