– जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमातून प्रा. विजयश्री जाधव यांचा विद्यार्थिनींना बहुमोल सल्ला
– विवेकानंद आश्रमात महिला दिन साजरा; विविध क्षेत्रातील महिलांचा सहभाग
हिवरा आश्रम/मेहकर (समाधान म्हस्के पाटील) – विवेकानंद आश्रमात दि. ८ मार्च हा जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन वसतिगृहात पदवी शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींनी केले होते. मुलींना आधुनिक युगात सायबर अवेअरनेस असणे अत्यंत महत्वाचे झाले असून, डिजीटल युगात फसवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, इंटरनेट व एआयचा वापर सावधगिरीने करा, असा महत्वपूर्ण सल्ला प्रा. विजयश्री सावजी यांनी याप्रसंगी उपस्थित विद्यार्थिनी व महिलांना दिला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदामाता वसतिगृहाच्या अधीक्षिका प्रा. अश्विनी काळे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठाकरे, प्रा.विजयश्री सावजी, ज्येष्ठ विचारवंत व धर्मशास्त्राचे अभ्यासक रुख्मिणी माऊली तसेच अॅड. इशिता किरण डोंगरदिवे या होत्या. महिलांना मिळालेल्या अधिकाराचा योग्य वापर करुन त्यांनी सर्वांगीन प्रगती करावी. देशाच्या जडणघडणीत महिलांचा मोठा सहभाग लाभला असून, जिजाऊ मॉसाहेब, सावित्रीबाई फुले, रमाई, अहिल्याबाई, शारदादेवी यांच्या कर्तृत्वाने महिलांच्या जगण्याला नवीन अर्थ प्राप्त झाला. शिक्षणानेच आपला उध्दार होणार असल्याचे अश्विनी ठाकरे यांनी सांगितले. मुलींना आधुनिक युगात सायबर अवेअरनेस असणे अत्यंत महत्वाचे झाले असून, डिजीटल युगात फसवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, इंटरनेट व एआयचा वापर सावधगिरीने करण्याचे महत्व प्रा. विजयश्री सावजी यांनी व्यक्त केले.
या जगात दृष्ट व वाईटांना पराभूत करण्याची शक्ती ज्ञान व चारित्र्यात आहे. विवेकानंद आश्रमात प.पू. शुकदास महाराजांनी मुलींसाठी मोठ्या प्रमाणात शिक्षणाची कवाडे खुली केली आहेत. या परिसरात असलेले संस्कारीत व अध्यात्मिक वातावरण मुलींना सकारात्मक व पवित्र बनविते. ज्ञानासोबत चारित्र्य संवर्धनाचे धडे दिले जातात. ही समस्त बापांसाठी अत्यंत दिलासा देणारी बाब आहे. संकटाला घाबरु नका, एकटेपणावर मात करण्यासाठी पालकांशी सुसंवाद करा, कारण आपले पालक व आपले गुरुजण हेच आपले खरे हितचिंतक आहेत, असे विचार ह.भ.प. रुख्मिणी माऊली यांनी व्यक्त केले. अॅड. इशिता किरण डोंगरदिवे यांनी कायद्यात महिलांसाठी असलेल्या तरतुदीं बाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणार्या विद्यार्थीनी व कर्तृत्ववान महिलांचा संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सानिका निकम, स्वरा देशमाने, गायत्री जाधव या मुलींनी आपले विचार व्यक्त केले. संचलन स्नेहा जाधव, सानिका निकम यांनी तर प्रास्ताविक पूजा घुले हिने केले. भाषणानंतर मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.