– मेंडगाव येथील प्रकार; पतीविरोधात गुन्हे दाखल!
मेरा बुद्रूक (प्रताप मोरे) – पत्नीच्या अंगावर असलेली सोन्याची पोत माहेरी ठेवली. त्यामुळे सोन्याची पोत माहेरवरून घेवून ये, असे म्हणत दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. यात पत्नी जखमी झाली असून, पतीविरोधात तिने पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यातक्रारीवरून पोलीसांनी मारहाण करणार्या पतीविरोधात गुन्हा केला आहे. ही घटना मेंडगाव येथे काल, दि.३ मार्चरोजी घडली.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या मेंडगाव येथील रहिवासी प्रकाश हरचंद्र खरूळे व त्यांची पत्नी सौं.सीमा प्रकाश खरूळे (वय ३७) हे आनंदात संसार करीत होते. परंतु क्षुल्लक कारणावरून दोघा पती-पत्नीमध्ये वाद होवू लागले. त्यात प्रकाश खरूळे यांना दारूचे व्यसन जडले. दारूच्या व्यसनापायी पती आपल्या गळ्यातील सोन्याची पोत विकून टाकेल, या भीतीने पत्नी सीमा हिने ती सोन्याची पोत माहेरी ठेवली. हा प्रकार पतीला माहिती होताच दारू पिऊन पत्नीला हटकले की सोन्याची पोत तू तुझ्या भावाकडून सुरत येथून घेऊन ये, अशा क्षुल्लक कारणावरून रागाच्याभरात पतीने पत्नीला काठीने पत्नीच्या मांडीवर, कमरेवर, डोक्यावर बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. अशी तक्रार पत्नीने पोलीस स्टेशनला दिली. महिलेची तक्रार व मेडिकल रिपोर्ट पाहून ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार गजानन वाघ यांनी आरोपी प्रकाश हरचंद्र खरूळे, रा.मेंडगाव याच्याविरुद्ध कलम ११८ (१) भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.