वीज ही मुलभूत गरज, ग्राहकांभिमूख सेवा देण्यावर राहणार भर!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – वीज ही मुलभूत गरज आहे.त्यामुळे परिमंडळात पायाभूत विकासासोबत महावितरणची सेवा ग्राहकाभिमूख करण्यावर भर राहणार असल्याचे प्रतिपादन महावितरण अकोला परिमंडळ येथे नव्याने रूजू झालेले मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले. मुख्य अभियंता सुहास रंगारी यांची बदली गोंदीया येथे झाल्याने हे पद रिक्त झाले होते. अकोला परिमंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून तत्कालिन एमएसईबी बोर्डात रूजू झालेले राजेश नाईक यांना तत्कालिन बोर्ड ते महावितरण असे २८ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी पदोन्नती मिळाली आहे. कनिष्ठ अभियंता , उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता अश्या महावितरणच्या सर्वच पदावर काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
यापूर्वी अधीक्षक अभियंता वाशी ,अधीक्षक अभियंता भंडारा आणि अधीक्षक अभियंता नागपूर ग्रामीण अश्या ग्रामीण ते शहरी भागात महत्वाच्या पदावर काम करण्याचा अनुभवही त्यांच्याकडे आहे. अभ्यासू व परिणामकारक प्रशासनासाठी ओळख असलेले श्री.नाईक कंपनीचे हित सर्वश्रेष्ठ मानत कर्मचाऱ्यांशी सलोख्याने काम करणारे तसेच कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुख्य अभियंता पदाचा पदभार सांभाळताना तत्काळ विभाग निहाय बैठका घेऊन परिमंडळाची थोडक्यात माहीती जाणून घेतली. महावितरणच्या विविध योजनांचा लाभ ग्राहकांना मिळावा,पायाभूत विकासाच्या कामांना गती देणे,अखंडित वीज सेवा देण्यासोबत वीज ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडविणे आणि शंभर टक्के वीजबिलाची वसुली करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.