– शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांचे आवाहन
– कर्जमाफी, भावफरकाचा दिलेला शब्द पाळलाच नाही; मात्र हक्काच्या मालाचे पैसेही रखडवले – विनायक सरनाईक
चिखली (महेंद्र हिवाळे) – क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना भेडसावणारे प्रश्न घेवून न्याय मिळवून देण्यासाठी बुलढाण्यात मंगळवारी (दि.२५) शेतकर्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. जिल्ह्यातील व राज्यातील शेतकर्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्यांसाठी ही बैठक असून, या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी केले आहे. महायुती सरकारने सत्तेवर आल्यास कर्जमाफी करू, असा शब्द दिला होता. त्याचप्रमाणे सोयाबीनचे भाव पडल्याने निवडणूक काळात भावफरक रक्कम देऊ, असासुद्धा शब्द दिला होता. त्याचप्रमाणे निवडणूक काळात गावागावात पीकविमा प्रश्नावर शेतकर्यांनी अनेक उमेदवारांना जाब विचारला होता. तेव्हा सर्व समस्या सोडवू, असा शब्द तेव्हा महायुतीमधील नेत्यांनी दिला होता. मात्र दिलेला शब्द पाळायचे तर सोडाच दोन महिने उलटले तरीसुद्धा हमीभाव केंद्रावर दिलेल्या सोयाबीन शेतमालाचे म्हणजेच घामाच्या दामाचे पैसे अजून शेतकर्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. शासन आणि प्रशासन शेतकरी संकटात असताना करतय काय? असा सवालदेखील सरनाईक यांनी उपस्थित केला. शेतकर्यांनी स्वतःच्या हक्कासाठी एकत्रित येत लढा उभारावा, असे आवाहनदेखील सरनाईक यांनी केले आहे.
शेतकर्यांच्या हक्काचा पीकविमा, सोयाबीन-कापूस भावफरक, नाफेडमध्ये अडकलेली शेतकर्यांची रक्कम, रखडलेले अनुदान यासह इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी विचारमंथन व आंदोलनात्मक पाऊल उचलण्यासाठी शेतकर्यांची महत्वपूर्ण बैठक मंगळवार, दि.२५ फेब्रुवारीरोजी बुलढाणा येथील चिखली रोडवर असलेल्या शिवगड हॉटेलमध्ये (जुने गोलांडे लॉन)येथे आयोजित केली आहे. सकाळी १० वाजता ही बैठक होणार आहे. रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार असून, शेतकर्यांना तुपकर मार्गदर्शन करणार आहेत. शेतकर्यांना जिल्ह्यात सतत भेडसवणारे प्रश्न व राज्य भरातील प्रलंबीत मागील वर्षीचा व चालू वर्षीचा पीकविमा, नुकसान भरपाई, कर्जमाफी, भावफरक यासह शेतकर्यांचा सोयाबीन शेतमाल हमीभावाने खरेदी केला मात्र दोन महिने उलटूनदेखील अनेक शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही तर आजही जिल्ह्यातील हजारो शेतकरी हक्काचे पैसे मिळणेपासून वंचित आहेत. ही बाब गंभीर असूनदेखील विदर्भ मार्वेâटिंग फेडरेशन व जिल्हा मार्वेâटिंग फेडरेशन व जिल्हा प्रशासन करतय तरी काय? झोपा काढतय का? असा सवाल विनायक सरनाईक यांनी हमीभाव केंद्रावर शेतकर्यांचा पडून असलेले सोयाबीन व वेअर हाऊसला पाच पाच दिवस उभे असलेले वाहनांच्या रांगा बघून उपस्थित केला होता. तर अडीच लाख क्विंटल खरेदी केलेला माल शासकीय वेअर हाऊसला जमा होणार कधी आणि शेतकर्यांना पैसे (चुकारे) मिळणार कधी? असा प्रश्न सरनाईक, राजपूत यांनी मागील आठवड्यात उपस्थित केला होता. या प्रश्नी संबंधित अधिकारी यांच्यामुळेच शेतकर्यांचे चुकारे अडकले असून, उपाययोजना न केल्याने व समन्वय नसल्यानेच हा प्रकार घडला असल्याने या मागणीसाठीसुद्धा तीव्र आंदोलन छेडण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले जाणार असल्याचे दिसून येत आहे. या बैठकीला शेतकरी, कष्टकरी व जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी केले आहे.
शेतकर्यांना देशोधडीला लावणार्या सरकारविरोधात रविकांत तुपकर पुन्हा फुंकणार रणशिंग!