KARAJATPachhim Maharashtra

रवळगावाने पशुहत्या न करण्याचा घेतला निर्णय!

आशीष बाेरा

कर्जत : रवळगावचे भूमिपुत्र व जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजकुमार लोढा यांनी आपल्या गावातील श्री खंडोबाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारप्रसंगी पुढाकार घेत, गावाला विश्वासात घेऊन यात्रेत हजारो पशूंची हत्या बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यास रवळगावच्या ग्रामस्थांना तयार केल्याने या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.  ग्रामस्थांनी ही अत्यंत मोठ्या मनाने ग्राम सभा घेऊन या निर्णयास मान्यता दिली आहे. तर जेजुरी देवस्थानचे विश्वस्त व गावाचे भूमिपुत्र डॉ. राजकुमार लोढा यांनी गावात प्रतिजेजुरी उभारण्याची ग्वाही देत, ग्रामस्थांना फार माेठा दिलासा दिला आहे.

सध्याचे मंदिर
संकल्प चित्र

कर्जत तालुक्यातील रवळगाव हे सध्या अनेक कारणाने गाजत असून येथील दैवत श्री खंडोबाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले,  हे मंदिर सिमेंट मध्ये बांधण्याचा निर्णय घेत 25 लाखाचे बजेट काढण्यात आले व वर्गणीची पुढाकार घेणाऱ्या मंडळीनी सुरुवात ही केली.  गावातील जे लोक बाहेर राहतात त्याच्याशी संपर्क सुरू झाला, यामध्ये श्री खंडेरायाचे मूळ स्थान असलेले जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ राजकुमार लोढा यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी हे मंदिर सिमेंट मध्ये बांधण्या वजी आपण दगडात बांधले तर जास्त काळ राहू शकेल, असा प्रस्ताव मांडला, पण त्यासाठी बजेट काढले असता कोट दीड कोट रुपये लागतील, असे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांना तर प्रश्नच पडला. इथे शे पाचशे रुपये लोक लवकर देत नाहीत, सध्याच्या बजेट नुसार पंचवीस लाख कसे जमवायचे असा प्रश्न आहे मग हे कोटी दीड कोटी अशक्य बाब आहे. यावेळी लोढा यांनी त्याची चिंता तुम्ही करू नका, जेवढा तुम्ही जमवणार आहेत तेवढे जमवा बाकीचे मी पाहतो, असा शब्द दिला. पण यासाठी एक अट घातली की आपल्या गावात खंडोबा पुढे जे हजारो पशुचे बळी दिले जातात ते बंद करावे लागतील. हे ऐकून उपस्थितांमध्ये चलबिचल झाली.  ग्रामस्थांचा रितीरिवाज व अंध श्रद्धा पाहून खंडोबाचे मूळ स्थान असलेल्या जेजुरीला असे पशु बळी दिले जात नाहीत. मग इथे कसे असा प्रश्न उपस्थित करत,  एखाद्या ग्रामस्थांला वाटले आपण पशुबळी न दिल्याने आपले नुकसान झाले तर त्या व्यक्तीने भंडारा हातात घेऊन हे सांगायचे, आपण त्याची नुकसान भरपाई देऊ, असे आवाहनच दिले. हे ऐकून ग्रामस्थांंनाही ही बाब पटली व सर्वानी एकत्र ग्रामसभा घेऊन रवळगावमध्ये यापुढे पशु हत्या करायची नाही, असा मोठा निर्णय घेतला.

लाेढांचा ग्रामस्थांनी केलेला सत्कार.

यावेळी डॉ राजकुमार लोढा यांचा सत्कार करत गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली,  या निर्णयाचे वेळी ज्या ग्रामस्थांंनी जागरण गोंधळ ठरवले होते त्यांंनी मेनू बदलून गोड जेवण करणार असल्याचा निर्णय जाहीर केला.  या निर्णयामुळे रवळगाव मध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, श्री खंडोबा देवस्थानचा अत्यंत चांगल्या पद्धतीने जीर्णोद्धार करून येथे प्रति जेजुरी आपण सर्वजण मिळून बनवू,  लोक येथे दर्शनासाठी आले पाहिजेत,  खास फिरायला आले पाहिजेत असे काम करू, असा निर्धार लोढा यांनी व्यक्त केला.  त्यास सर्व ग्रामस्थांनी जयघोष करत एकत्रित प्रतिसाद दिला व रवळगाव मध्ये ऐतिहासिक पशुहत्या बंदीचा निर्णय घेण्यात आला.  या निर्णयाने विविध स्तरातून रवळगाव ग्रामस्थांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!