– परभणी शहरात दगडफेक, जाळपोळ; पोलिसांकडून सौम्य लाठीमार
– परभणीत तणावपूर्ण शांतता, शहराला आले छावनीचे स्वरूप
– चोवीस तासांत आरोपी अटक करा, अन्यथा परिणाम भोगा; अॅड. आंबेडकरांचा सरकारला इशारा
परभणी (विशेष प्रतिनिधी) – मराठवाड्यातील परभणी येथे संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्याची घटना घडल्यानंतर आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या हाकेला हिंसक वळून लागले असून, आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक केली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. मात्र, जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. आंदोलकांमध्ये महिलांचादेखील समावेश आहे. अनेक महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनीही पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. परभणी बंद असताना जी दुकाने सुरू होती, अशी दुकाने आंदोलकांनी पेटवून दिल्याची माहिती आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार घडला. शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे, वसमत शहरामध्येदेखील कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मोर्चा काढत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, संविधानाच्या प्रतीची विटंबना करणार्या माथेफिरूला परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी परभणीतील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेतील आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याचा आरोप केला आहे. प्रस्तुत घटनेतील समाजकंटकांना २४ तासांत अटक करा, अन्यथा परिणामास तयार राहा, असा इशारा आंबेडकरांनी या प्रकरणी दिला आहे.
सविस्तर असे, की परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असणार्या परिसरात एका व्यक्तीकडून संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली. यामुळे आंबेडकर अनुयायी प्रचंड संतप्त झाले. कालपासून हा संताप घुमसत होता. बहुसंख्य नागरिक आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमा झाले. त्यानंतर त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त आंदोलकांनी पाईप पेटवले. दुकानाबाहेरील साहित्य आणि बोर्डची तोडफोड केली. एवढेच नाही तर जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. जमाव आक्रमक झाल्यानंतर पोलिसांकडून जमावावर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. आंदोलकांकडून जाळपोळ करण्यात आल्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात होते. परभणीतील सध्याची परिस्थिती पाहता, जिल्हा प्रशासनाच्यावतीने बुधवारी दुपारी १ वाजेपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहील, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने एका पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. शहरात जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर एसटी बसच्या फेऱ्या थांबवण्यात आल्या आहेत. इतर जिल्ह्यातून जालना मार्गे परभणी आणि जिंतूर जाणाऱ्या जवळपास 15 एसटी बस जालन्यातील मंठा येथील बसस्थानकावर थांबवल्या आहेत. जालन्यातील परतुर आणि अंबड आगारातील परभणीकडे जाणाऱ्या 7 बस फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
परभणी शहर बंद दरम्यान, काही मोर्चेकरी महिला थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांना आत सोडले. कार्यालयात शिरल्यानंतर आंदोलक महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही मोर्चेकरांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकरांचा इशारा
परभणीत काही समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या २४ तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही म्हटले आहे.
IG परभणीत दाखल, म्हणाले – परिस्थिती नियंत्रणात
परभणीतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे नांदेड परिक्षेत्राचे IG शाहजी उमप शहरात दाखल झाले आहे. शहाजी उमप म्हणाले की, परभणीत मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर आज बंद पुकारला होता. आज बंद आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे, असा आंदोलकांचा कार्यक्रम होता. परंतु निवेदन देण्यासाठी येताना काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. तर काही ठिकाणी टायर जाळले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आणि पुरुषांनी तोडफोड केली. परंतु आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे IG उमप यांनी सांगितले.