– कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष; कोळंबकर देणार नवनिर्वाचीत आमदारांना शपथ
– हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्र्यांचा शपथविधी, खातेवाटपही जाहीर करणार – फडणवीस
मुंबई (खास प्रतिनिधी) – राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच कामाला सुरूवात केली असून, गोगरिब रूग्णांना वैद्यकीय मदतीच्या फायलींवर सह्या करून त्यांनी कामाचा श्रीगणेशा केला. दरम्यान, ७ डिसेंबरपासून विधानसभेचे विशेष सत्र बोलविण्यात आले असून, भाजपचे कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार आहे. आज दुपारी १ वाजता त्यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे राजभवनात शपथ देतील. तर विशेष सत्रात कोळंबकर हे नवनिर्वाचीत आमदारांना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत.
आज विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे कालिदास कोळंबकर यांचा शपथविधी झाल्यानंतर ते २८८ नवनिर्वाचीत आमदारांना शपथ देतील. या शिवाय, दिनांक ९ डिसेंबररोजी विधानसभेच्या अध्यक्षाची निवडदेखील त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. त्यानंतर १५ व्या विधानसभेसाठी सत्तेवर आलेले देवेंद्र फडणवीस सरकार हे विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करेल.
कालच, देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला होता. शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झालेले राज्यातील दुसरे नेते ठरले आहेत. तर अजित पवार यांनी तब्बल सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्यात इतिहास रचला आहे. इतक्यावेळा उपमुख्यमंत्री होणारे ते एकमेव नेते आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, की विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. तसेच, त्यांना खातेवाटपही जाहीर होईल. आमच्या भूमिका बदलल्या असल्या तरी, आमची दिशा तीच आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल. विरोधी पक्षनेतेपदाबाबत विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेतील.
—————–