चिखली (एकनाथ माळेकर) – खांद्यावर भगवी पताका, कपाळी केशरी रंग, गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ आणि मृदुंग, अंगात पांढरा शुभ्र पोशाख, विजार आणि धोतर, डोक्यावर टोपी आणि मुखी श्री गजाननाचा जयघोष करीत, पंढरपूर येथून परतलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे आगमन होऊन बुधवारी सकाळी किनगावराजाकडे प्रस्थान झाले. किनगाव राजा येथे श्रींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्री गजाननांच्या जयघोषणाने किनगाव नगरी दुमदुमली होती. पुढे लोणार येथेही जोरदार स्वागत झाले. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. आज गुरुवार, श्रींचाच वार असल्याने भाविकांच्या आनंदाला उधाण आले होते.
शेगावीचा राणा श्री गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरची आषाढवारी उरकून गजानन महाराजांची पालखी शेगावकडे प्रस्थान करीत आहे. या पालखीचे सकाळी दहा वाजेच्यादरम्यान किनगावराजा येथे आगमन झाले. यावेळी भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने पालखीचे स्वागत केले. श्रीच्या पालखीचे किनगाव राजात आगमन होताच नागरिकांच्यावतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भक्तिमय वातावरणातील या पालखी सोहळ्याचे किनगावराजामध्ये ठिकठिकाणी स्वागत झाले. अनेकांनी पालखी मार्गावर रांगोळी काढली होती.
पोलीस स्टेशन किनगाव राजा येथे श्रीच्या पालखीमधील भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे श्री च्या पालखीचे स्वागत किनगावराजा पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आले व पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवून सुव्यवस्थेसाठी परिश्रम घेतले. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. पालखीच्या शेवटी खेळण्याची दुकाने होती, यातील खेळणी खरेदी करण्यासाठी लहान मुलांची झुंबड उडाली होती. पुढे लोणार, मेहकर येथेही श्रींच्या पालखीचे जोरदार स्वागत होत होते. भाविक, भक्त, नागरीकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.
Leave a Reply