बंडखोरी नंतर नवीन शिलेदारांकडे शिवसेना जिल्हाप्रमुख पदांची जबाबदारी
नंदुरबार( प्रतिनिधी) नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेला मोठे भगदाड पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील आक्रमक नेते आमदार आमश्या पाडवी आणि जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गणेश पराडके यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली असून दोघेही नेते आक्रमक म्हणून ओळखले जातात. तसेच तळागाळातील आणि दुर्गम भागातील आदिवासी बांधवांमध्ये यांचा मोठा जनसंपर्क असून याचा फायदा भविष्यात पक्ष बांधणीसाठी होणार असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी टाकली आहे.
जिल्ह्यात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिंदे गटात तर माजी जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर निष्ठावंत सैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मातोश्री वर जात उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्ह्यातील जवळपास १० हजार निष्ठावंतांचे प्रतिज्ञापत्र सोपवले होते. गेलेले नेते हे नेते असून कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत राहिलेल्या शिवसैनिकांच्या जोरावर पुन्हा जिल्हा भगवामय करण्याचा निर्धार दोन्ही जिल्हाप्रमुखांनी केला आहे.