ChikhaliCrimeVidharbha

टीप यशस्वी ठरली; अन् चिखली पोलिसांनी चक्क गांजाचा कंटेनरच पकडला!

– खामगाव-जालना रोडवरील हॉटेल लालपरी येथे ठाणेदार संग्राम पाटलांच्या पथकाची कारवाई

चिखली (कैलास आंधळे) – चिखली पोलिस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांना गोपनीय खबर्‍याने दिलेली टीप यशस्वी ठरली असून, पाटील यांच्या पथकाने तब्बल ३१.५० लाखांचा गांजा वाहतूक करणारा कंटेनरच पकडला आहे. खामगाव-जालना मार्गावरील हॉटेल लालपरी येथे आज (दि.१६) दुपारी पोलिसांनी केलेल्या या कारवाईने परिसरातील गांजा तस्करांत एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, खामगाव ते जालना महामार्गाने यूपी २१ सीएन ४०३५ क्रमांकाच्या कंटेनरमधून बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक होणार आहे. या खबरीवरून दुपारी तीन वाजेच्या सुमारास जालना रोडवर हॉटेल लालपरी येथे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय मातोंडकर, पोलिस उपनिरीक्षक शरद भागवतकर, नितीनसिंह चौहाण, पोलीस अंमलदार विजय किटे, चंद्रशेखर मुरडकर, गजानन काकड, सुनिल राजपुत, सुरज राजपुत, जिल्हा वाहतूक शाखेचे निलेश शिंगणे, संतोष चिडे यांचे पथक व नायब तहसीलदार संतोष मुंढे, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक राहुल रोकडे, फोटाग्राफर, सरकारी पंच तसेच अंमली पदार्थ शोध पथकातील श्वान एंजलसह सापळा रचण्यात आला.चिखलीकडून एक लाल रंगाचा यूपी २१ सीएन ४०३५ क्रमांकाचा कंटेनर दिसताच त्यास थांबवून पंचासमक्ष कंटेनरची झडती घेतली असता, त्यामध्ये खाकी रंगाचे चिकटपट्टीने पॅकींग केलेले प्रत्येकी ५ किलो वजनाचे एकूण ४२ पाकिटे वजन २१० किलो ज्याची किंमत ३१ लाख ५० हजार रूपये असलेले मिळून आले. सदर मिळेल आलेल्या पाकीटातील पदार्थाची पाहणी केली असता त्यामध्ये उग्र वासाचा गांजासदृश्य पदार्थ दिसून आला. या पदार्थाचा बुलढाणा पोलीस दलाचे श्वान पथकाचे संजय चाफले यांनी श्वान एंजल यास वास दिला असता, श्वानाने सदर पदार्थ हे अंमली पदार्थ असल्याबाबत इंडीकेशन दिले. पोलीसांची व पंचांची खात्री होताच सदर कंटेनर चालक चंदरपाल जिवाराम रा. शांतीविहार बरेली उत्तरप्रदेश यास ताब्यात घेऊन कंटेनर व गांजाची पाकीटे असा एकूण ५१ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेण्यात आला आहे. या आरोपी याचेविरुध्द कलम २० (ब) अंमली औषधी द्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, ठाणेदार चिखली यांच्या नेतृत्त्वात् सपोनि संजय मातोंडकर, पोउपनि शरद भागवतकर, पोउपनि नितीनसिंह चौहाण, पोलीस अंमलदार विजय किटे, चंद्रशेखर मुरडकर, गजानन काकड, सुनिल राजपुत, सुरज राजपुत, जिल्हा वाहतुक शाखेचे पोनि रवी राठोड यांचे पथकातील निलेश शिंगणे, संतोष चिडे, श्वान पथकातील संजय चाफले यांचे पथकाने केली आहे. सदर गांजा हा आरोपी याने कोठून आणला, तो कोठे घेऊन चालला होता याबाबत अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!