CrimeLONAR

चोरपांगर्‍यात घरफोडी करून साडेचार लाखाचे सोने-चांदीचे दागिने लंपास

– ठाण्याहून घरी आले आणि चोरट्यांच्या हातसफाईने हादरले!

बिबी (ऋषी दंदाले) – येथून जवळच असलेल्या चोरपांगरा (वीर पांग्रा) येथे आनंदा तुकाराम डहाळके (वय ५२) यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास साडेचार लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

सविस्तर असे, की चोरपांग्रा (वीर पांगरा, ता. लोणार) येथे आनंदा तुकाराम डहाळके वय वर्ष ५२ रा. वीरपांग्रा, हल्ली मुक्काम काटे मानवली, जिल्हा ठाणे शहर येथे व्यवसायानिमित्ताने राहतात. काही कामानिमित्त सकाळी ते गावी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घरात प्रवेश केला असता, घरातील कपाटाच्या दरवाजा तोडलेला दिसला व सर्व सामान अस्ताव्यस्त झालेले दिसून आले. त्यांनी कपाटामध्ये पाहिले असता, त्यांना कपाटातील रोख रक्कम व दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लागलीच घरामध्ये चोरी झाल्याचे लक्षात आल्याबरोबर त्यांनी बिबी पोलीस स्टेशन गाठले व झालेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. त्यानंतर ४ जानेवारीरोजी प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये सदर व्यक्तीच्या घरातील सोन्याची गहुमण्याची पोथ, सोन्याची एकदानी, सोन्याच्या पाटला एक जोड, फॅन्सी टॉप्स, चांदीचे कडे एक जोड, चांदीचे जोडवे, सोन्याची ब्रासलेट, एक सोन्याची चैन, सोन्याची रिंग जोडी, सोन्याचे पेंडॉल व त्यांच्या आईच्या कपाटामध्ये ठेवलेले नगदी रक्कम तीन हजार रूपये असा एकूण ४ लाख ४९ हजार ६८५ रुपयाचा ऐवज व नगदी रोख रक्कम चोरीला गेली आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात बिबी पोलिसांनी ४५७, ३८० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर तपास बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!