‘बळीराजावरचं संकट दूर कर, प्रत्येकाला सुखाचे दिवस येऊ दे’; मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे!
– नेवाशातील वाकडीच्या काळे दाम्पत्याला मिळाला शासकीय महापूजेचा मान!
पंढरपूर (विशेष प्रतिनिधी) – विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची आस घेऊन अनेक किलोमीटर अंतर पायी चालून पंढरपूर येथे आलेल्या वारकर्यांच्या विठूनामाच्या गजरात आज पहाटेपासून या उत्सवाला सुरुवात झाली. पहाटे अडीच वाजता विठ्ठल मंदिरामध्ये विठुरायाची शासकीय महापूजा सुरू झाली. विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली. यंदा अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी (ता. नेवासा) येथील भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि सौ.मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्यास मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबर महापूजेचा मान मिळाला. काळे दाम्पत्य गेल्या पंचवीस वर्षांपासून पंढरपूरची पायी वारी करत आहेत. राज्यातल्या शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य लोकांना सुखाचे दिवस यावेत… हे राज्य सुजलाम सुफलाम् व्हावं…..बळीराजावरचं संकट दूर होऊ देत… या राज्यातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनात समृद्धीचे दिवस येऊ देत, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडुरंगाच्या चरणी घातले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणारी ही दुसरी शासकीय महापूजा आहे. महापूजेनंतर मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाच्या वारकर्यांचा सत्कार करण्यात आला. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरांत विठ्ठलाची पूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रुक्मिणी मंदिरातही रुक्मिणी मातेची पूजा केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या महापूजेनंतर एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात झाली. पहाटेपासूनच चंद्रभागा स्नानासाठी वारकर्यांनी गर्दी केली आहे. तर नगर प्रदक्षिणा मार्गावर मोठ्या संख्येने भाविक पहाटेपासून दिंड्या घेऊन निघाले होते. भगव्या पताका, भजनी ठेका आणि मुखी विठ्ठल विठ्ठल नाम अशा घोषात सारी पंढरी नगरी दुमदुमलेली दिसून आली. आषाढी एकादशीसाठी सुमारे १२ लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना वारकरी संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून भक्तीभाव, विनम्रता आणि करुणा या मूल्यांचा अंगिकार करण्याची प्रेरणा मिळू देत. भगवान श्री विठ्ठलातच्या आशीर्वादाने आपण सर्वांनी एक आनंदी, शांतताप्रिय आणि समावेशक समाजाच्या उभारणीसाठी काम करू, असे पंतप्रधानांनी आषाढी एकादशीनिमित्त दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
———