– अज्ञात व्यक्तीच्या भेटीनंतरच मुंबईकडे येण्याचा निर्णय
– मुंबईकडे निघालाे सांगून, अचानक दिल्लीला गेले, कुणाला भेटले?
गुवाहाटी (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे दोन वाजेच्या सुमारास अचानक रेडिसन ब्लू या हॉटेलमधून भाजपचे खासदार पल्लब दास यांच्यासोबत बाहेर पडले. त्याची कोणतीही कल्पना त्यांनी सहकार्यांना दिली नाही. आणि दोन तासानंतर ते परत आले. मधील दोन तास ते कुठे होते, कुणा अज्ञात व्यक्तीला भेटले, हे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. हॉटेलमध्ये परत आल्यानंतर शिंदे यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय जाहीर केला व नंतर ते मुंबईकडे निघाले. परंतु, पुन्हा अचानक ते दिल्लीला गेले. शिंदे व बंडखोरांना कुणी तरी अज्ञात व्यक्ती गाईड करत असल्याचा संशय या घटनेवरून निर्माण झालेला आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक आमदार हे आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेल रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. त्यांचा पाहुणचार तेथील भाजपचे मुख्यमंंत्री करत आहेत. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास कुणाला काही एक न सांगता, एकनाथ शिंदे हे भाजपचे खासदार व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय पल्लब दास यांच्यासोबत हॉटेलच्या बाहेर पडले. ते कुठे गेले काहीच कुणाला कळत नव्हते. तब्बल दोन तास शिंदे गायब होते. ते कुणा तरी अज्ञात व्यक्तीला भेटले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोन तासानंतर ते हॉटेलमध्ये परतले. मध्यंतरीच्या काळात प्रसारमाध्यमांनी विविध अटकळी बांधणार्या बातम्या चालवल्या. परंतु, शिंदे यांनी काहीही न बोलता मौन पाळले. शिंदे हे कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते, अशी सारवासारव नंतर केली जात आहे.
हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी मुंबईकडे येण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु, ते दिल्लीला गेले. तेथे त्यांनी एका वजनदार केंद्रीय मंत्र्याची भेट घेतल्याचे सांगण्यात येते. आता मुंबईत येऊन ते उपसभापतींपुढे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. दुसरीकडे, उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्नही केला जाणार असल्याचे सूत्राने सांगितले. उपसभापतींनी शिंदे यांना शिवसेना गटनेते पदावरून हटविण्यास मान्यता दिली आहे. तत्पूर्वी, शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे हे गुवाहाटी येथे जाऊन एकनाथ शिंदे यांना भेटले. त्यामुळे शिंदे यांना समर्थन देणार्या आमदारांची संख्या आता ५० झाली आहे. या सर्व आमदारांची शिंदे यांनी गुवाहाटीत बैठक घेऊन पुढील रणनीतीवर चर्चाही केली.
#WATCH | Assam: Shiv Sena's Eknath Shinde returns to Radisson Blu Hotel in Guwahati after around 2.5 hours. He had reportedly visited Kamakhya Temple to offer prayers. pic.twitter.com/9yKMRNI3MT
— ANI (@ANI) June 24, 2022