– आरोपीच्या शोधासाठी स्वतंत्र तपास पथक गठीत
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या नावे उपविभागीय अधिकारी यांना बनावट संदेश पाठविणार्या विरूद्ध बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गुरूवारी, दि. १९ जानेवारी २०२३ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखा तपास करीत असून, तपासासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात येत आहे. या घटनेने महसूल विभागात खळबळ उडालेली आहे.
मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. श्री. राठोड हे जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रशिक्षणास आले होते. दरम्यान, त्यांना दुपारी दोन वाजताच्या सुमारास ८३३०००७२९५ या क्रमांकावरून एक संदेश आला. या संदेशाला उत्तर देताना आपण कोण आहात, अशी विचारणा केल्यानंतर आपण जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड, आयएएस अशा आशयाचा संदेश पाठविला. श्री. राठोड यांना याबाबत साशंकता वाटल्याने त्यांनी सदर व्हॉटस्अपची तपासणी केली असता, सदर क्रमांकावर एच. पी. तुम्मोड, आयएएस आणि डीपी ठेवलेला असल्याचे आढळून आले. सदरील मोबाईलधारक व्यक्ती हा बनावट असू शकत असल्याने श्री. राठोड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात रितसर लेखी तक्रार नोंदवावी. आवश्यकता असल्यास प्रत्यक्ष भेटून निवेदन द्यावे. सबब जिल्हाधिकारी यांच्या नावे येणार्या व्हॉटस्अॅपवरील बनावट संदेशाला कोणताही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.