– तळेगावच्या घाटात पत्नीला दगडाने ठेचले, नंतर जाळला मृतदेह
– दोन्ही आरोपींना अटक, पोलिसांच्या तपास कौशल्यावर यशाची मोहोर
वर्धा (प्रकाश कथले) – नागपूर – अमरावती महामार्गावरील तळेगाव (श्यामजीपंत) लगतच्या चक्रीघाटात १० डिसेंबर रोजी जळालेल्या अवस्थेत मिळालेल्या महिलेच्या मृतदेहाच्या मृत्यूचे रहस्य उलगडले असून, या महिलेला चारित्र्याचा संशय घेत तिच्या पतीनेच दगडाने ठेचून ठार केले नंतर तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याचे स्पष्ट झाले आहे. मरण पावलेली महिला नेर – मंगरूळ ता.नांदगाव,या गावची रहिवासी आहे.तिचा खून तिचा पती मनिष भोसले तसेच त्याचा मावसभाऊ प्रवीण पवार यांनी कट रचून केल्याचे स्पष्ट झाले आहे.दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
खून झालेल्या महिलेचे नाव ज्योत्स्ना मनिष भोसले (वय ३२) आहे. तिला दुचाकीवर बसवून तळेगावच्या चक्रीघाटात आणले होते. तळेगावच्या चक्रीघाटात तिला ५ डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान आणल्यानंतर तिथे त्यांच्यात वाद झाला. येथेच मनिष भोसले याने पत्नी ज्योत्स्नाचा दगडाने ठेचून खून केला नंतर सोबत आणलेले पेट्रोल तिच्या अंगावर टाकून तिची ओळख पटणार नाही, अशा पद्धतीने जाळले.नंतर तो तसेच त्याचा सहकारी पसार झाला. १२ डिसेंबर रोजी हा मृतदेह दिसला.पोलिसांना पहिल्या पाहणीतच हा खुनाचा प्रकार असल्याचे लक्षात आले. पण घटनास्थळी किंवा परिसरात कोठलाही मृतदेहाची ओळख पटविणारा पुरावा मिळत नव्हता. त्यातच बेपत्ता महिलांची माहितीही तपासून पाहिली पण काहीच धागेदोरे जुळत नव्हते. पण पोलिसांचे अथक प्रयत्न सुरू होते. त्याला यश मिळाले.खुनाला वाचा फूटली.
पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी या तपासाकरीता पोलिसांच्या ६ चमू तयार केल्या होत्या. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.सागर कवडे सातत्याने तपासातील प्रगतीची माहिती घेत होते.पोलिसांनी तब्बल ३ हजार बेपत्ता महिलांची माहिती घेतली. राज्यासह शेजारच्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील महिला बेपत्ता आहेत काय, याचाही शोध घेतला. टोलनाक्यासह पेट्रोलपंपांच्या आवारातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. कापड विक्रेते, चप्पल विक्रेते, उपाहारगृह,आदी ठिकाणी माहिती घेतली गेली. पण काहीही सुगावा हाती लागत नव्हता. तरीही पोलिसांचे अविश्रांत प्रयत्न सुरू होते.आशा वर्कर्सचीही तपासात मदत घेतली गेली. अखेर पोलिसांना यश आले.मंगरूळ ता.नांदगाव जि.अमरावती, येथील एक महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी त्यावर लक्ष केंद्रीत केले. पोलिसांना घटनास्थळी महिलेच्या अंगावर अर्धवट जळालेली साडी, बेन्टेक्सचे दागिने तसेच अर्धवट जळालली चप्पल मिळाली होती. पोलिसांनी या बेपत्ता महिलेबाबत तपास केला असता तिची आई मुंबईत राहात असल्याचे कळले. तिला पोलिसांनी बोलावून घेतले. तिला छायाचित्रे दाखविली. त्यावर तिने ही तिची मुलगी ज्योत्स्ना असल्याचे मान्य करीत तिचा विवाह नेरच्या मनिष भोसले याच्यासोबत झाला होता, असे सांगितले.
पोलिसांनी मनिष भोसले याचा शोध सुरू केला. त्यात तो अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नांसह दरोड्याचे विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती मिऴाली. पोलिस त्याच्या मागावर असल्याचे पाहून तो पळून जाण्याचा प्रयत्नात होता. पण जंगलात त्याचा पाठलाग करून त्याला पोलिसांनी अटक केली. त्याने पत्नीचा खून त्याचा मावसभाऊ प्रवीण पवार याच्या मदतीने केल्याचे सांगितले.पत्नीच्या चारित्र्यावर त्याला संशय होता.यातूनच त्याने तिच्या खुनाचा कट त्याच्या मावसभावाच्या मदतीने रचला. घटनेच्या दिवशी ज्योत्स्ना मनिष भोसले ही लग्न समारंभात होती.तिला मनिषचा मावसभाऊ प्रवीण याने दुचाकीवर बसवून घेतले. काही अंतर गेल्यानंतर दुचाकीवर मनिष भोसले बसला. पुढे हे तिघेही दुचाकीने तळेगावच्या महामार्गावरील चक्री घाटात आले. तेथे अंधार होता.त्याचवेळी बाजूला निवांतस्थळी गेल्यानंतर त्यांचा ज्योत्स्नासोबत वाद झाला.त्यानंतर मनिष भोसले याने दगडाने ठेचून पत्नीचा खून केला तसेच सोबत आणलेल्या पेट्रोलने तिचा मृतदेह जाळून दोन्ही आरोपी पसार झाले.
पोलिस अधीक्षक नुरूल हसन,अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.सागर कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल साळुंके यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शोध शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड,तळेगावचे ठाणेदार आशिष गजभिये,उपनिरीक्षक अमोल लगड,हुसेन शहा,पवन भांबूरकर,सहायक फौजदार निरंजन वरभे,गजानन लामसे,रणजित काकडे,राजेश तिवसकर,राजेश जयसिंगपुरे,गोपाल बावणकर,राकेश आष्टनकर,संघसेन कांबळे,विकास अवचट,अमोल ढोबाळे,दिनेश बोथकर,चालक अखिल इंगळे,गजानन दरणे,बालाजी म्हस्के,नीलेश करंडे,मंगेश मिल्के, अंकुश निचत,अमोल मानमोडे,श्याम गावनेर,आशिष नेवारे,कुणाल कांबळे,मनोज आसोले आदींनी केली.
तपास किचकट होता.महिलेची ओळख पटत नव्हती. सुमारे तीन हजार महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यातील ही खून झालेली महिला नव्हती.पण पोलिसांनी तपासात दाखविलेली चिकाटी, पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी सातत्याने तपास करणार्या अधिकार्यांच्या संपर्कात राहून त्यांना दिलेले प्रोत्साहन,यातून घटनास्थळी कोठलाही पुरावा नसताना खुनाला वाचा फूटली. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी तपास करणार्या अधिकारी, कर्मचार्यांना शाब्बासकी देत त्यांना ५० हजारांची बक्षीसीही जाहीर केली.