-दुष्काळी सवलतींसह पीकविमा नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी; तहसीलदारांना निवेदन
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : तालुक्यात पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप पिकांची स्थिती गंभीर झाली असून, सिंदखेडराजा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी, २२ सप्टेंबर रोजी तहसीलदारांकडे निवेदन सादर केले. याच मागणीसाठी ‘वाजवा पुंगी, जागवा शासन’ आणि ‘पुंगी बजाव, शासन जगाव’ आंदोलन करण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, अनेक भागांतील उडीद, मूग व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी निवेदनात केला आहे. अन्य खरीप पिकांच्या उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसाअभावी हाताशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. खरीप हंगामाचीच अवस्था बिकट झाली असताना आगामी रब्बी हंगामात पिकांची पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. उत्पादनासाठी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची भीती व्यक्त करीत आहेत.
दुष्काळी सवलती व पीकविमा मदतीची मागणी
या पार्श्वभूमीवर शासनाने सिंदखेडराजा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात, पीकविमा नुकसानभरपाईचा लाभ मिळवून द्यावा, तसेच दुष्काळ निवारणासाठी तालुक्यासाठी विशेष उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर कैलास नारायण मेहेत्रे यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी संजय खडसे आणि तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.