-उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी; एसआरपीएफ व दंगा नियंत्रण पथकाकडून प्रात्यक्षिक
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : गणेशोत्सव मंडळांच्या वतीने २५ सप्टेंबर रोजी साखरखेर्डा येथे गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली.
गावातील सण-उत्सवांच्या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. शांतता भंग झाल्यास पोलीस अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर कशाप्रकारे नियंत्रण मिळवू शकतात, याचे प्रात्यक्षिक साखरखेर्डा बसस्थानक परिसरात करून दाखविण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणूक २५ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता संताजी जगनाडे महाराज चौकातून निघणार आहे. यावेळी गावातील सर्व आठ गणेश मंडळांचे गणपती संताजी जगनाडे महाराज चौकात एकत्र येऊन मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील. त्यानंतर दगडी मस्जिद, गुजरी चौक, गणपती चौक, अहिल्याबाई होळकर नगर, रोहिलपुरा, माळी पेठ मार्गे मिरवणूक भोगावती नदीकाठी जाऊन गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.
बसस्थानक परिसरात दंगा नियंत्रणाचे प्रात्यक्षिक
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसांनी विशेष तयारी केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे व ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले. यावेळी मिरवणूक मार्गाची पाहणीही करण्यात आली. साखरखेर्डा बसस्थानक परिसरात एसआरपी पथक, दंगा नियंत्रण पथक, पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांनी शांतता भंगाच्या परिस्थितीत नियंत्रण मिळविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. माजी सैनिक तथा अनिकेत सैनिक स्कूलचे अध्यक्ष अर्जुन गवई यांच्या नेतृत्वाखाली सैनिक व पोलीस भरतीसाठी सहभागी विद्यार्थीही या प्रात्यक्षिकात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी मार्च काढल्यानंतर निर्माण झालेल्या शांतता भंगाच्या परिस्थितीवर पोलिसांकडून कशाप्रकारे नियंत्रण मिळविले जाते, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार युवराज रबडे यांनी केले आहे.