-दीड महिन्यापासून पावसाची दडी; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रायमुलकरांनी जाणून घेतली पिकांची स्थिती
लोणार (वाजिद खान) : गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी करून बळीराजाला दिलासा देण्यासाठी माजी आमदार संजय रायमुलकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह लोणार तालुक्यातील २२ गावांच्या शेतशिवारात जाऊन पीक पाहणी केली. मेहकर-लोणार तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शासनाकडे यापूर्वीच करण्यात आली असून, ही मागणी रेटून धरण्याचे काम करणार असल्याचे रायमुलकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी स्वतःजवळील पैसा तसेच कर्ज घेऊन उभ्या केलेल्या पैशातून खरीप हंगामाची पेरणी केली. बियाणे, रासायनिक खते, पिकांवरील फवारण्या तसेच मशागतीचा सर्व खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद तसेच फळबागा सुकत चालल्या आहेत. खरीप पिके बहुतांश हातातून निघून जाण्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांची शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणे, त्यांना दिलासा देणे आणि शासन आपल्या पाठीशी असून निश्चितपणे मदत मिळवून दिली जाईल, असा विश्वास देण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या वतीने हा पीक पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.
नैसर्गिक संकटात शासनाने मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी
‘आमच्यावर मोठे नैसर्गिक संकट ओढवले असून, या आपत्तीमध्ये सरकारने मदत करावी,’ अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. पिकांची दयनीय परिस्थिती सांगताना अनेक शेतकऱ्यांना भावना अनावर झाल्या. यावेळी संजय रायमुलकर यांनी शेतकऱ्यांना, “आम्ही समर्थपणे आपल्या सोबत आहोत. महायुती सरकारने यापूर्वी शेतकऱ्यांना भरीव मदत केली आहे. याही वेळेस निश्चितपणे सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल,” असे सांगितले.
२२ गावांत पीक पाहणी
रायमुलकर यांनी अंत्री देशमुख, मोहोतखेड, मातरखेड, गुधा, वेणी, बागुलखेड, गुंजखेड, जाफराबाद, दाभा, पहूर, आरडव, वढव, कौलखेड, सोनुना, शिवनी जाट, गंधारी, सावरगाव मुंडे, रायगाव, नांद्रा, टिटवी, धाड आणि पांग्रा डोळे या गावांना भेटी देऊन पीक पाहणी केली. या दौऱ्यात शिवसेनेचे जिल्हा संघटक दिलीपराव देशमुख, जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, तालुकाप्रमुख भगवानराव सुलताने, नीरज रायमुलकर, राजेश तांबिले, प्रल्हादराव सुलताने, सुनील सुलताने, विठ्ठल घायाळ, डॉ. प्रदीप मोरे, आबा राव हाडे, रमेश हाडे, अंकुश मुंडे, सदाशिव मुंडे, शिवाजी मोरे, भगवानराव कोकाटे यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.