-भरधाव ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; नितीन कापरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, फाट्यावर गतीरोधक बसविण्याची मागणी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : मेहकर–चिखली मार्गावरील देऊळगाव माळी फाट्यावर भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वाराला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतक युवकाचे नाव नितीन प्रकाश कापरे (वय २३, रा. देऊळगाव माळी) असे आहे. या घटनेमुळे देऊळगाव माळी गावावर शोककळा पसरली आहे.
नितीन कापरे हे काही कामानिमित्त देऊळगाव माळी येथून मेहकरकडे जात होते. त्याचवेळी मेहकरकडून ट्रक क्रमांक एमएच १६ ए.वाय. ८१९९ भरधाव वेगाने येत होता. या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात नितीन गंभीर जखमी झाले, तर त्यांची मोटारसायकल ट्रकखाली आल्याने चक्काचूर झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी जखमी नितीन यांना तातडीने मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. १५ सप्टेंबर रोजी दुपारी मोठ्या शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे.
मेहकर–चिखली या राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, देऊळगाव माळी–नागझरी फाट्यावर गतीरोधक नसल्याने तसेच देऊळगाव माळी गावाकडून मुख्य मार्गावर येणाऱ्या वाहनांना मेहकरकडून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देऊळगाव माळी–नागझरी फाट्यावर तातडीने गतीरोधक बसवावा, अशी मागणी होत आहे. आज नितीन कापरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, उद्या कोणाचा नंबर लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी तातडीने आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.