-लाभक्षेत्र वाढवून अतिरिक्त ८४४ हेक्टर सिंचनाखाली आणण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी
चिखली (अंकुश पाटील) : खडकपूर्णा प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजनेच्या (टप्पा क्र. ३) लाभक्षेत्रामध्ये अंचरवाडी लघु पाटबंधारे तलाव क्रमांक १, अंचरवाडी लघु पाटबंधारे तलाव क्रमांक २ तसेच मिसळवाडी लघुतलावाचा समावेश करून त्यांना खडकपूर्णा प्रकल्पाचा भाग म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू भारत बोंद्रे यांनी पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित तीनही लघुतलावांची उभारणी सुमारे ४० वर्षांपूर्वी झाली असून त्यानंतर खडकपूर्णा मोठा सिंचन प्रकल्प साकारण्यात आला. सन २०१४ पासून या प्रकल्पातून सिंचन सुरू झाले, तर २०१७ मध्ये प्रकल्पाचे व्यवस्थापन सिंचन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. मात्र, खडकपूर्णा प्रकल्पाचे लाभक्षेत्र निश्चित करताना या तीन लघुतलावांच्या सिंचन क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला नाही. या तिन्ही लघुतलावांवर पाणी वापर संस्थांची स्थापना करण्यात आली असली, तरी कालव्यांची अत्यंत जीर्ण अवस्था असल्याने त्या प्रभावीपणे कार्यरत होऊ शकलेल्या नाहीत. परिणामी लाभधारक शेतकऱ्यांना कोणत्याही सिंचन प्रकल्पाचा अपेक्षित लाभ मिळत नसून सिंचनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र २५,८०० हेक्टर असून त्यापैकी सुमारे १४,५०० हेक्टर क्षेत्र उपसा सिंचन योजनेअंतर्गत येते. या योजनेसाठी ३० दलघमी पाणी नियोजित असल्याने संबंधित तीन लघुतलावांचे लाभक्षेत्र डिनोटिफाय करून ते खडकपूर्णा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट केल्यास उपलब्ध पाण्याचा अधिक परिणामकारक वापर होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सध्या या तिन्ही लघुतलावांचे एकूण लाभक्षेत्र १,७९७ हेक्टर असून त्यापैकी केवळ ९५३ हेक्टर क्षेत्रावरच सिंचन होत आहे. हे क्षेत्र खडकपूर्णा प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक ३ मध्ये समाविष्ट केल्यास अतिरिक्त ८४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल, असा दावा शंतनू बोंद्रे यांनी केला आहे. या मागणीसंदर्भात संबंधित विभागाकडून तातडीने प्रस्ताव सादर करून आवश्यक प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोजभाऊ कायंदे आणि चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनाही देण्यात आल्या आहेत.