-प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांचे निवेदन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील बसस्थानकाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, प्रवाशांच्या सोयीसाठी सध्याच्या जागेवरच सर्व सुविधांनी युक्त सुसज्ज मिनी बसस्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात देशपांडे यांनी म्हटले आहे की, साखरखेर्डा गावाची लोकसंख्या सुमारे २५ ते ३० हजार असून येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भारतीय स्टेट बँक, १२ पतसंस्था, पोलीस ठाणे, तीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दोन खासगी प्राथमिक शाळा, तीन माध्यमिक विद्यालये, तीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा, दोन पेट्रोल पंप तसेच मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. याशिवाय नव्याने मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय लवकरच सुरू होणार असून ग्रामीण रुग्णालयाची इमारतही पूर्ण झाली आहे.
साखरखेर्डा हे परिसरातील सुमारे ७५ गावांचे प्रमुख केंद्र असल्याने बँकिंग, पोलीस, आरोग्य, शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांसाठी दररोज हजारो नागरिक येथे ये-जा करतात. मात्र, प्रवाशांसाठी अद्यापही सुसज्ज बसस्थानक उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गावातील तसेच परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून बसस्थानकाची मागणी आहे. मात्र जागेअभावी हा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या जागेवरच मिनी बसस्थानक उभारून प्रवाशांसाठी बसथांबा, प्रतीक्षागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
देशपांडे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागते. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा अशा कोणत्याही ऋतूत प्रवाशांना ऊन, वारा आणि पावसाचा सामना करत उभे राहावे लागते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधाही अत्यंत आवश्यक आहे. साखरखेर्डा परिसरातील नागरिकांची वाढती गरज लक्षात घेता परिवहन विभागाने तातडीने सुसज्ज मिनी बसस्थानक उभारण्याचा निर्णय घ्यावा आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.