बुलढाण्यात ५८ जातींची वज्रमूठ; जनआक्रोश मोर्चात आनंदराज आंबेडकर, आमदार सिद्धार्थ खरात यांचा सरकारवर घणाघात!
बुलढाणा (बाळू वानखेडे) : अनुसूचित जातींमधील आरक्षण उपवर्गीकरणाच्या आडून राज्य सरकार समाजात भांडणे लावण्याचे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप करत, ही प्रक्रिया त्वरित न थांबवल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेला घेराव घातला जाईल, असा सज्जड इशारा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे. “सरकारमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी खुल्या वर्गात उपवर्गीकरण करून दाखवावे,” असे थेट आव्हानही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकरहून तब्बल १५० हून अधिक वाहनांच्या भल्यामोठ्या ताफ्यासह बुलढाण्यात प्रवेश करत या मोर्चात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. बुलढाणा येथे आयोजित आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील महामोर्चात त्यांची ही भव्य आणि जोरदार उपस्थिती संपूर्ण आंदोलनात विशेष चर्चेचा विषय ठरली.
आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात बुलढाणा येथे २९ जुलै रोजी आंबेडकरी समाजातील ५८ जातींनी एकत्र येत सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढला होता. शहरातील स्टेट बँक चौकात आयोजित विशाल सभेत ते बोलत होते.
सभेला संबोधित करताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५९ जातींना घटनात्मक संरक्षण देऊन संपूर्ण समुदाय एकत्र राहील ही भूमिका मांडली होती. मात्र, हे सरकार या सामाजिक ऐक्यालाच नख लावत आहे. यासंदर्भात २७ आमदारांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले असूनही त्यांनी अद्याप भेटीसाठी वेळ दिलेली नाही. यावरून त्यांच्या मनात काळेबेरे असल्याचे स्पष्ट होते,” असा आरोप आमदार खरात यांनी केला.
तसेच आंबेडकरी जनतेच्या वाटेला गेल्यास सत्तेवरून खाली खेचू, असा इशाराही त्यांनी दिला. या जनआक्रोश मोर्चात विविध आंबेडकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी राज्य सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार निशाणा साधला:
- दीपक केदार (अध्यक्ष, अखिल भारतीय दलित पॅंथर): “शासनाला मुळात आरक्षण द्यायचेच नाही. संघाचा जन्मच आरक्षण संपवण्यासाठी झाला आहे. मात्र, जोपर्यंत निळा झेंडा आहे, तोपर्यंत आरक्षण कोणीही संपवू शकत नाही.”
- भानुदास विसावे (अध्यक्ष, चर्मकार महासंघ): “बदर समितीचा अहवाल सार्वजनिक नसताना हरकती कशा मागितल्या जातात? हे उपवर्गीकरण आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.”
- चंद्रकांत हांडोरे (खासदार): “उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मातंग समाजाला चुचकारून आरक्षण संपवण्याचा डाव सुरू आहे. मी सामाजिक न्यायमंत्री असताना लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशी केल्या होत्या, त्यांची अंमलबजावणी अजून का झाली नाही?”
- प्रा. जोगेंद्र कवाडे (सरसेनापती): “आरक्षणाचे तुकडे करण्याचे काम सुरू असून, केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारलाही झुकवू. मातंग समाजाने आता आपले मित्र आणि शत्रू ओळखले पाहिजेत.”
- अमन आंबेडकर (युवा नेते): “बाबासाहेबांचे विचार टिकवण्यासाठी आणि मनुवादी कटकारस्थाने उधळून लावण्यासाठी या सरकारला निवडणुकीत उखडून फेका.”
या भव्य मोर्चात हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले होते. सभेच्या शेवटी विविध मागण्यांचे निवेदन चिमुकल्यांच्या हस्ते तहसीलदार कुमरे यांना सुपूर्द करण्यात आले. मोर्चात सहभागी झालेल्या अनुयायांसाठी अन्न-पाण्याची सोय स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने करण्यात आली होती. यावेळी भाई अशांत वानखडे, लक्ष्मणराव घुमरे, दिलीपराव जाधव, आशिष खरात, इंजि. विजय मोरे, राजू सावळे, भाई कैलास सुखधाने यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल पैठणकर यांनी केले, तर विनोद इंगळे यांनी आभार मानले.